कांदा अनुदानासाठी त्रिसदस्य समितीचा पाहणी अहवाल सादर करावा- प्रशासक ठोंबळ
The inspection report of the three-member committee should be submitted for onion subsidy- Administrator Thombal
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu18 May23 ,19.20 PmBy राजेंद्र सालकर
कोपरगाव : ज्या शेतकर्यांनी कांदा लागवडीची नोंद सात बारा उतार्यावर केलेली नाही, तर स्वतःच्या हस्ताक्षरात कांदा पीक पाहणी नमूद केली आहे, अशा शेतकर्यांनी अनुदान प्राप्तीसाठी शासनाकडून नेमण्यात आलेल्या त्रिसदस्य समितीचा पाहणी अहवाल बाजार समितीकडे सादर करावा, असे आवाहन कोपरगाव बाजार समितीचे प्रशासक तथा सहा. निबंधक नामदेव ठोंबळ सचिव नानासाहेब रणशूर यांनी केले आहे.-
१ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये ज्या शेतक-यांनी कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य़ बाजार आवारात तसेच शिरसगांव –तिळवणी उपबाजार आवारात कांदा विक्री केली आहे. अशा शेतकर्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये आणि जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी या प्रमाणात अनुदान शासनाकडून देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी शेतकर्यांच्या सात बारा उतार्यावर ई-पीक पेर्यांची नोंद झालेली नाही. अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गावपातळीवर संबंधीत गावाचे तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांची समिती गठित करण्यात आली आहे.
या समितीने शेतकर्यांच्या कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहाणी करुन, शंका असल्यास आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करुन सत्यता पडताळून, शहानिशा करावी व सातबारा उतार्यावरील नोंदीसमोर स्पष्टपणे नमूद करावे, असे प्रमाणित केलेले सात बारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील.
सदर समितीकडील अहवाल शेतक-यांनी तात्काळ कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य़ कार्यालयाकडे सादर करावेत, विहीत मुदतीनंतर आलेल्या अहवालाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन प्रशासक ठोंबळ व सचिव रणशूर यांनी केले आहे.