फलकाशिवाय क्रीडासंकुल कसे समजणार ? – आ. आशुतोष काळे

फलकाशिवाय क्रीडासंकुल कसे समजणार ? – आ. आशुतोष काळे

वृत्तवेध ऑनलाईन । 27 July 2020
By : Rajendra Salkar, 17.55Pm

कोपरगाव : क्रीडा संकुल कुठे आहे हे मलाच माहिती नाही तेंव्हा कोपरगाव शहरातील युवा वर्गाला क्रीडासंकुल कुठे आहे हे कसे समजणार असा प्रश्न उपस्थित करून क्रीडा संकुलाचा युवा वर्गाला लाभ घेता यावा यासाठी किमान क्रीडा संकुल असल्याचा फलक तरी लावा व या क्रीडा संकुलाचा लाभ हा जास्तीत जास्त युवा वर्गाला मिळाला पाहिजे यासाठी क्रीडा संकुल समितीने प्रयत्न करावेत अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी क्रीडा संकुल समितीला दिल्या.

क्रीडा संकुल पाहणी

कोपरगाव शहरातील युवा वर्गासाठी उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाची आमदार आशुतोष काळे यांनी नुकतीच पाहणी करून क्रीडा संकुलात उपलब्ध असलेल्या सुविधा व भविष्यात आवश्यक असणाऱ्या सुविधा याचा आढावा घेतला. यावेळी क्रीडा संकुल समितीला सूचना करतांना ते म्हणाले की, या क्रीडा संकुलाचा शहर व तालुक्यातील युवा वर्गाला लाभ मिळाला पाहिजे मात्र हे क्रीडा संकुल हे कोपरगाव शहरापासून दूर असल्यामुळे याचा फायदा होत नाही.ज्याना या क्रीडा संकुलाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यापर्यंत क्रीडा संकुलाबाबत माहिती पोहोचणे गरजेचे आहे. क्रीडा संकुलात जाण्यासाठी अहमदनगर-मनमाड राज्य मार्गाने जावे लागते. या राज्यमार्गावर असलेली रहदारी व संभाव्य अपघातामुळे शालेय विद्यार्थी या क्रीडा संकुलात जाण्याचे टाळत असल्यामुळे शालेय विद्यार्थी या क्रीडा संकुलाचा लाभ घेऊ शकत नाही. हे क्रीडा संकुल युवा वर्गासाठी अत्यंत महत्वाचे आहे. या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून उद्याचे प्रतिभावान खेळाडू घडणार असून या खेळाडूच्या कामगिरीतून कोपरगाव तालुक्याचे नाव उंचावले जाणार आहे. त्यासाठी जास्तीत युवा वर्गाला या क्रीडा संकुलाचा लाभ मिळणे गरजेचे आहे. या क्रीडा संकुलासाठी भविष्यात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी-सुविधा देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी यावेळी सांगीतले. यावेळी क्रीडा संकुल समितीचे कार्याध्यक्ष तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम विभाग उपअभियंता प्रशांत वाकचौरे, क्रीडा अधिकारी प्रकाश मोहरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वीरेन बोरावके, मंदार पहाडे, हिरामण गंगूले,सुनील शिलेदार,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे, मेहमूद सय्यद, फकीरमामु कुरेशी, क्रीडा संकुल समिती सदस्य बी.सी. वर्पे, आर. बी. पाटणकर, जी.पी.नरोडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page