कोपरगाव शहर विकास आढावा बैठक,
कोपरगाव शहरातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा – आशुतोष काळे
वृत्तवेध ऑनलाईन 28 जुलै 2020
By: Rajendra Salkar,15:45
कोपरगाव : कोपरगाव शहरातील प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करा, पाठपुरावा करून प्रस्ताव पाठवा असे निर्देश आमदार आशुतोष काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कोपरगाव शहरातील प्रलंबित विकास कामांबाबत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, बांधकाम अभियंता दिगंबर वाघ, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, हिरामण गंगूले,राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, सुनील शिलेदार, मेहमूद सय्यद, फकीरमामू कुरेशी आदी उपस्थित होते.
श्री. काळे म्हणाले की, शहरातील टपरीधारक व्यावसायिकांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शहरात ज्या ज्या ठिकाणी जागा उपलब्ध होईल त्या-त्या ठिकाणी अद्यावत व्यापारी संकुल निर्मितीसाठी प्रस्ताव तयार करावा. भाजी मार्केटमधील गाळे व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावी.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृहाच्या दुरुस्तीचा देखील प्रस्ताव तयार करावा व कोपरगाव शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. व शारदानगर परिसरात पावसाचे पाणी येवून निर्माण होत असलेल्या अडचणींवर कायमचा तोडगा काढावा असे आदेश आमदार आशुतोष काळे यांनी जागतिक बँक अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.