पात्र पथविक्रेत्यांना मिळणार १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज – प्रशांत सरोदे
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी शहरी फेरीवाला, पथविक्रेता
वृत्तवेध ऑनलाईन । 28 July 2020, 17 :25
By: Rajendra Salkar
कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री स्वनिधी शहरी फेरीवाला / पथविक्रेता सूक्ष्म-पतपुरवठा या वैयक्तिक कर्ज योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असून पात्र पथविक्रेत्यांना १० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी प्रशांत सरोदे यांनी दिली आहे.
प्रशांत सरोदे म्हणाले, कोरोना महामारी ( Corona virus) संकटाचा फटका मोठ्या पासून ते लहाना पर्यंत सर्व वर्गाला बसला आहे. विशेष याचा फटका व्यवसाय करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून अद्यापही त्यांचा व्यवसाय सुरू होऊ शकलेला नाही. याचा विचार करून कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने पथविक्रेत्यासाठी दहा हजार रुपयापर्यंत कर्ज देण्याची व्यवस्था सुरु केली आहे. शहरी फेरीवाला / पथविक्रेता यांना सूक्ष्म-पतपुरवठा करण्यासाठी मार्गदर्शक सुचने प्रमाणे पात्र लाभार्थींना बँकेमार्फत प्रती लाभार्थी रुपये १००००/- इतके कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर प्रमाणे वितरीत झालेल्या कर्ज प्रस्तावांना ७% व्याज अनुदान लाभार्थीनी नियमित कर्जाची परत फेड केल्यास दर तिमाही व्याज अनुदानाचा लाभ मिळणार आहे.असे प्रशांत सरोदे यांनी सांगितले.
प्रशांत सरोदे म्हणाले, केंद्र व राज्य शासन, नगर विकास विभाग यांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे कोपरगाव नगरपरिषद, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागा आणि मार्केट विभाग यांच्या मार्फत शहरातील पथविक्रेते यांचे कायम, हंगामी, व तात्पुरते या गटात बायोमॅट्रिक पद्धतीने सर्वेक्षण दिनांक १ ऑगस्ट २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या दरम्यान करण्यात आले आहे. सदरील सर्वेक्षणामध्ये एकूण १०४६ पथविक्रेते यांची नोंदणी झाली आहे.
हे संपूर्ण कर्ज केंद्र सरकार देणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश कोरोना महामारीमुळे फेरीवाल्यांचे नुकसान झाले आहे. ते कमी करण्याचा आणि त्यांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न आहे, याचा पात्र फेरीवाल्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत सरोदे यांनी शेवटी केले आहे.