कोपरगाव नगरपालिका झोपली काय ? – मनसे
हात पंपाची एकदा तर पाण्याची रोज चोरी, गुन्हा दाखल होणार का ?
कोपरगाव : नागरिकांचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी नगरपालिकेने गोदाम गल्ली संजय मेडिकल जवळ हातपंप बसविला होता. शहरातील मध्यवस्तीत असलेल्या चौकातुन हातपंप अनेक वर्षापासून चोरीला गेला आहे. कोपरगाव नगरपालिका झोपली काय ? हात पंपाची एकदा तर पाण्याची रोज राजरोस चोरी होत आहे मग गुन्हा दाखल करणार का ? असा सवाल कोपरगाव मनसेच्या वतीने पालिका प्रशासनाला करण्यात आला असून आपण काही करणार नसाल ! तर आम्हाला मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल असा इशारा एका निवेदना व्दारे पालिका प्रशासनाला मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
सदर इशारा देणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मंगळवारी (२८ जुलै) रोजी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना यांच्या दालनात जाऊन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, हा हातपंप चोरीला गेल्याची नोंदही नगरपालिकेत आहे.सदर हातपंप हा एका प्रतिष्ठित व्यापा-याने स्वतःच्या फायद्याचे करिता चोरुन अनेक वर्षापासून या कुपननलिकेचे पाणी स्वतःच्या घरात पाईपलाईन व्दारे वापरत आहे.सदर हातपंप चोरणा-यांनी हातपंपच चोरला नसून जनतेचे पाणी अनेक वर्षापासून चोरले आहे.अशा चोराला नगरपालिकेने लवकरात लवकर पकडून गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
या निवेदनावर सतिष काकडे शहराध्यक्ष अलिम शहा ता.अध्यक्ष अनिल गाडे विजय सुपेकर रघुनाथ मोहिते बंटी सपकाळ नितिन त्रिभुवन जावेदभाई शेख सचिन खैरे संजय धोत्रे सागर महापूरे नवनाथ मोहिते बापू काकडे आनंद परदेशी संजय जाधव यांच्या सह्या आहेत.