गौतम स्कूलच्या दोन्ही हॉकी संघाकडे पुणे विभागाचे नेतृत्व
Both Gautam School’s hockey teams lead the Pune division
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onThu 21Sep24, 19.40Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी मैदानावर जवाहरलाल नेहरू विभागीय हॉकी स्पर्धा पार पडल्या, असून गौतम पब्लिक स्कूलच्या संघाने विजयी घोडदौड कायम ठेवल्याने हे दोन्ही संघ पुणे विभागाचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नुर शेख यांनी दिली आहे.
दोन दिवस चाललेल्या ह्या स्पर्धेत अनेक चित्तथरारक व कौशल्यपूर्ण खेळाची अनुभूती प्रेक्षकांना अनुभवण्यास मिळाली. स्पर्धेचा समारोप संस्थेच्या सचिव व अहमदनगर जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैताली काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांनी स्पर्धेतील सर्व संघाच्या आपुलकीने चौकशी करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संपूर्ण स्पर्धेत गौतमच्या सब-ज्युनिअर व ज्युनिअर संघाने आपला दबदबा कायम ठेवत आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत स्पर्धेवर आपले वर्चस्व कायम ठेवले. गौतमच्या सब-ज्युनिअर संघाने अंतिम सामन्यात पुणे संघाचा २-० गोल फरकाने पराभव केला; तर ज्यूनियर संघाने सोलापूर संघाचा ३-० अशा गोल फरकाने पराभव केला. गौतमचे दोन्ही ज्युनियर व सब-ज्युनिअर संघ पुणे येथे दि. २५ सप्टेंबर पासून होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करणार करणार आहे.
सदर विभागीय स्पर्धेत ज्युनिअर व सब-ज्युनिअर गटातील पुणे विभागातील पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यांतून मुला मुलींचे एकूण २२ संघ सहभागी झाले होते. सदर सर्व संघातील खेळाडूंची गौतम पब्लिक स्कूलच्या शालेय प्रशासनाकडून राहण्याची व जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.
गौतम पब्लिक स्कूलच्या दोन्ही जूनियर व सब-ज्युनिअर विजयी संघांचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोक काळे, कोपरगाव तालुक्याचे आमदार व संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ. चैताली काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, हॉलीबॉल व क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद, सर्व हाउस मास्टर्स यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेचे पंच म्हणून अकबर खान व रिझवान शेख यांनी काम पाहिले.