गौतमच्या हॉकी संघाने दिल्लीचे मैदान गाजविले
Gautam’s hockey team rocked Delhi
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSat21 Oct24, 15.10Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने दुसऱ्या फेरीत पंजाब आणि दिल्ली संघाविरुद्ध नेत्रदीपक कामगिरी करून दिल्लीचे मैदान गाजविले. संघाचे सचिव चैताली काळे व आमदार आशुतोष काळेयांच्याकडून जोरदार स्वागत
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने दिनांक १२ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर २०२३ दरम्यान दिल्ली येथील छत्रपती शिवाजी हॉकी स्टेडियमवर पार पडलेल्या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करून दिल्लीचे मैदान गाजवले. गौतमच्या या हॉकी संघाने महाराष्ट्रातील बलाढ्य अशा कोल्हापूर, मुंबई, औरंगाबाद अशा संघांना पराभूत करून दिल्ली येथे महाराष्ट्राचे नेतृत्व केले. स्पर्धेत खेळतांना गोवा व मध्य प्रदेश संघांना अनुक्रमे ३-० व १४-० असे पराभूत करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या फेरीत पंजाब व दिल्ली संघांविरुद्ध नेत्रदीपक कामगिरी करून दिल्ली येथे महाराष्ट्राचे व गौतम पब्लिक स्कुलचे नाव उंचावले आहे.
दिल्ली येथून गौतम पब्लिक स्कूलमध्ये परतल्यानंतर सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचे शाळेचे प्राचार्य नूर शेख, सर्व शिक्षक व विदयार्थी यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी बोलतांना प्राचार्य नूर शेख यांनी सांगितले की, संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे यांच्या अभिनव संकल्पनेतून विश्वस्त आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत नवनवीन उपक्रम राबवले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून गौतम पब्लिक स्कुलने आजवर शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वरचष्मा कायम ठेवला असून यापुढील काळात देखील राहणार आहे. त्यासाठी सर्व शिक्षकवृंद मोठी मेहनत घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीचे मैदान गाजवणाऱ्या गौतमच्या सब-ज्युनिअर हॉकी संघातील सर्व खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोक काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैताली काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख आदींनी कौतुक करून व अभिनंदन केले. क्रीडा संचालक सुधाकर निलक व हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे यांनी मेहनत घेतली.