स्पर्धेशिवाय प्रगती नाही परंतु त्यासाठी स्पर्धा पण निकोप असावी – सौ पुष्पाताई काळे
There is no progress without competition but for that competition should be the cure – Mrs. Pushpatai Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat16 Dec 23, 19.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला एकमेकांच्या पुढे जायचे आहे.स्पर्धेमुळे ज्ञान प्रेम आणि मैत्री वृद्धिंगत होते स्पर्धेशिवाय जगण्याला मजा नाही आणि स्पर्धा असल्याशिवाय प्रगती देखील होत नाही. हे खरे असले तरी त्यासाठी स्पर्धा हि निकोप असावी असे आवाहन राधाबाई काळे कन्या विद्या मदिर स्थानिक स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांनी स्वर्गीय सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेच्या शुभारंभी अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले .
या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे, अरुण चंद्रे, स्कूल कमिटी सदस्य कचरू कोळपे, वाल्मिक कोळपे, सुरेगाव सरपंच सौ. सुमन कोळपे,उपसरपंच सौ.सीमा कदम, माजी प्राचार्य सुखदेव काळे, श्री छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, बाळासाहेब ढोमसे,रयत बँकेचे व्हा.चेअरमन दिलीप डहाळे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
त्या पुढे म्हणाल्या की, स्पर्धा म्हणजे एकाच गोष्टीसाठी चालणारी चढाओढ. मात्र हि चढाओढ किंवा स्पर्धा निकोप असावी, मन देखील निष्पाप असावे आणि आपल्या बरोबर स्पर्धेत असणाऱ्यांना देखील सोबत घेवून चालणारी असावी असा विचार कर्मवीर काळे साहेबांनी आयुष्यभर जपला. त्यांनी नेहमीच दुसऱ्याच्या प्रगतीत आनंद मानला. तीस वर्षापूर्वी ग्रामीण भागात आठवी नंतर मुलींची संख्या कमी होत असे. त्यावेळी सौ. सुशीलामाई काळे यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरु करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरु होवून मोठ्या प्रमाणात मुली उच्च शिक्षण घेवून प्रगती करीत आहेत हा त्यांच्या विचारांचा दूरदर्शीपणा असल्याचे त्यांनी सांगितले. वाचनाची सवय ठेवा, शिक्षण घेत असतांना स्पर्धेत सहभागी व्हा, भीती बाजूला ठेवून स्पर्धेची योग्य तयारी करून निकोप स्पर्धा करा हि स्पर्धा नेहमीच तुम्हाला जमिनीवर ठेवेल असा मौलिक सल्ला सौ. पुष्पाताई काळे यांनी यावेळी दिला.
यावेळी अरुण चंद्रे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मागे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यामागे सौ.लक्ष्मीबाई पाटील त्याप्रमाणे सहकार, शिक्षण क्षेत्रात राज्याचे नेतृत्व करणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या केलेल्या भव्य दिव्य विस्तारात सौ. सुशीलामाई काळे यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे स्वर्गीय शंकरराव कर्मवीर काळे हे मोठे समाजकार्य करू शकले.
डॉ. मच्छिंद्र बर्डे म्हणाले की, समाजात सर्व सामान्यांच्या उपयोगी पडणारी अशी फार थोडी माणसे असतात. जी माणस सर्वसमान्यांच्या उपयोगी पडतात त्यांची उन्नती करतात त्यापैकी एक सौ. सुशीलामाई काळे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक व पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या सौ.हेमलता गुंजाळ यांनी केले. सूत्रसंचालन श्रीम. भाग्यश्री पाटील यांनी केले तर आभार उपप्राचार्य मधुकर गोडे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षिका, विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.