राजकारणातील निकोप स्पर्धाच कोपरगावच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल-विवेक कोल्हे
Competition in politics will only boost the overall development of Kopargaon-Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Mon18 Dec 23, 19.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी व्यापाऱ्यांनी व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करून काळानुरूप स्वतःहात बदल घडवून आणण्याची गरज आहे. तद्वत कोपरगावच्या सर्वांगीण विकासाला राजकारणातील निकोप स्पर्धाच चालना देईल असा आत्मविश्वास सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी रविवारी (१७) रोजी समता पतसंस्था सभागृहात बक्षीस वितरण व पदाधिकारी पदग्रहण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला. व्यापारी महासंघ व किराणा असोसिएशनच्या प्रयत्नांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. संजय मालपाणी (संगमनेर), राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, आ. आशुतोष काळे, अनुराधा मालपाणी, अध्यक्ष राजकुमार बंब, कार्याध्यक्ष सुधीर डागा, अजित लोहाडे, उपाध्यक्ष केशवराव भवर, नारायणशेठ अग्रवाल, कोषाध्यक्ष तुलसीदास खुबाणी, महासचिव प्रदीप साखरे,गुलशन होडे, किरण डागा यांच्यासह व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट्स असोसिएशनचे सर्व संचालक, सभासद, व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
यावेळी डॉ. संजय मालपाणी व विवेक कोल्हे यांच्या हस्ते ग्राहक सन्मान योजनेतील विजेत्यांना बक्षीस वितरण व व्यापारी महासंघाचे संचालक गुलशन होडे, महावीर सोनी, संतोष गंगवाल व अन्य पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
विवेक कोल्हे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गालगत ‘स्मार्ट सिटी’ होणार होती; पण दुर्दैवाने ती गेली. ही ‘स्मार्ट सिटी’ झाली असती तर तालुक्याच्या विकासाला गती मिळाली असती. कोपरगाव तालुक्यातून मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, दौंड-मनमाड रेल्वेमार्ग, नगर-मनमाड महामार्ग, नागपूर-मुंबई जलदगती महामार्ग, सिन्नर-शिर्डी महामार्ग गेलेला आहे. कोपरगाव मतदारसंघात शिर्डी विमानतळ, कोपरगाव, पुणतांबा, साईनगर शिर्डी आदी महत्त्वाची रेल्वेस्थानके असून, प्रस्तावित सूरत-चेन्नई हा राष्ट्रीय महामार्ग कोपरगाव मतदारसंघातून जात आहे. रेल्वे, रस्ते व हवाई मार्गाने देशभरातील सर्व प्रमुख शहरांना अत्यंत सुलभतेने जोडणारे कोपरगाव हे मध्यवर्ती ठिकाण असून, या भागात व्यापार, उद्योग वाढीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा व अनुकूल परिस्थिती आहे. स्थानिक व्यापारी व उद्योजकांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. शिर्डीजवळ सावळी विहीर व चांदेकसारे-सोनेवाडी शिवारात नवीन एमआयडीसीला सरकारने नुकतीच मंजुरी दिली असून, या नवीन एमआयडीसीत भविष्यात अनेक नवीन उद्योगधंदे सुरू होणार आहेत. त्यामुळे हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार असून, कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघाच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. कोपरगावची बाजारपेठ फुलविण्यासाठी व ती विकसित करण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही देताना काका कोयटे यांनी यापुढे कोपरगावात सामाजिक, राजकीय क्षेत्रात समतोल साधला तर विकासाला गती मिळेल, असेही ते शेवटी म्हणाले.
यावेळी उद्योजक डॉ. संजय मालपाणी म्हणाले, आज सगळीकडे ‘मॉल संस्कृती’ फोफावत आहे. मात्र, व्यापाऱ्यांनी घाबरून न जाता सचोटीने व्यवसाय करावा. ग्राहकांचा विश्वास संपादन करून ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा देऊन आपल्यासोबत जोडून ठेवावे. आपल्या वर्तणुकीत काळानुसार बदल करावा. खर्चात बचत व गुणवत्ता वाढीवर भर द्यावा. मन स्थिर ठेवून बुद्धिकौशल्य वापरून काम केले पाहिजे. आपल्या पंचेंद्रियांवर व भाव-भावनांवर नियंत्रण ठेवले तर तुमच्यावर लक्ष्मीची कृपा नक्कीच होईल. श्रीमद् भगवद्गीता हा केवळ श्रीकृष्ण-अर्जुन यांच्यात रणांगणावर झालेला संवाद नसून तो अखिल मानवजातीच्या जीवनमूल्यांचा सार आहे.
विवेक कोल्हे यांनी डॉ. संजय मालपाणी यांचा सत्कार केला. सुधीर डागा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. केशवराव भवर यांनी आभार मानले.
चौकट
‘आपली खरेदी आपल्या कोपरगावमध्ये’ या अभियानांतर्गत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी स्वतः दिवाळीला स्थानिक बाजारपेठेत खरेदी केल्याने ग्राहकांचा या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद मिळाला – राजकुमार बंब अध्यक्ष व्यापारी महासंघ
Post Views:
83