कोपरगावच्या भाचीचे मोठे यश;क्लास न लावता अशी झाली एमपीएससी उत्तीर्ण

कोपरगावच्या भाचीचे मोठे यश;क्लास न लावता अशी झाली एमपीएससी उत्तीर्ण

Big success of Bachi of Kopargaon; Passed MPSC without taking classes

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Sat23 Dec 23, 15.00Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव : येथील निलीमा बाळकृष्ण नानकर या विद्यार्थिनीनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला तोंड देऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक या परीक्षेत  कुठलाही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास करुन तिने वर्ग २चे सरकारी पद प्राप्त केले आहे.यश मिळवून सर्वांसमोर आदर्श ठेवला असल्याची माहिती  कोपरगाव येथील कर सल्लागार  राजेंद्र काशिनाथ वरखडे (मामा) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. 

 पतीचे निधन झाल्यानंतर  मिनाक्षी नानकर यांनी आपल्या तिन्ही लेकींना घेऊन थेट कोपरगाव  माहेरी आल्या. येथील कर सल्लागार  राजेंद्र काशिनाथ वरखेडे यांनी आपल्या बहिणीला आणि तिन्ही भाचींना मोठा आधार दिला. मात्र, आपण कुणावरही अवलंबून रहायचं नाही असा चंग मिनाक्षी नानकर यांनी बांधला. परिणामी, शिवणकाम आणि स्वयंपाकाची कामे करुन त्यांनी तिन्ही लेकींना शिक्षणासाठी उद्युक्त केले. असंख्य अडचणी आल्या पण नानकर कुटुंबियांनी हार मानली नाही. मोठी कन्या शुभांगी हिने एमकॉमचे शिक्षण घेतानाच अकाऊंटंट म्हणून नोकरी पत्करली. त्याचवेळी तिने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (एमएसईबी)ची परीक्षा दिली. त्यात तिला यश आले. आज ती मुंबईत महावितरणमध्ये कार्यरत आहे.
द्वितीय कन्या हेमांगी हिने सुद्धा एमकॉमचे शिक्षण घेतले. तिनेही अकाऊंटटं म्हणून नोकरी करुन कुटुंबाला हातभार लावला. त्यानंतर ती सेट परीक्षा उत्तीर्ण झाली. आज ती पुण्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. या दोन्ही लेकींचे लग्न करण्यापासून सर्वच प्रकारची जबाबदारी मिनाक्षी यांनी पार पाडली. तर, धाकली कन्या निलीमा हिने एमकॉमचे शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससीचा ध्यास घेतला. गेल्या तीन वर्षांपासून तिने एमपीएससीच्या विविध परिक्षा दिल्या. आणि आज दुय्यम निबंधक पदाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ती उत्तीर्ण झाली आहे.
निलिमा ही एमकॉमचे शिक्षण घेत होती. त्याचवेळी अकाऊंट विषय शिकविणारे प्रा. रविंद्र जाधव यांनी निलिमाला एमपीएससीच्या परीक्षा देण्याचा सल्ला दिला. तो निलिमाने गांभिर्याने घेतला. मात्र, त्याविषयी तिला काहीही माहित नव्हते. अखेर तिने विविध पुस्तकांचे वाचन सुरू केले. त्यासाठी अभ्यासिका गाठली. विवाहित भगिनी शुभांगी आणि हेमांगी या दोघींनीही निलिमाच्या अभ्यासाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. अखेर निलिमाने थेट पुण्यातील हडपसर गाठले.
एमपीएससीचे कुठलेही क्लास न लावता हडपसरच्या महात्मा फुले अभ्यासिकेत सकाळी ७ ते रात्री ११ या वेळात प्रचंड अभ्यास केला. आणखी एका वाचनालयात ती रात्ररात्रभर अभ्यास करायची. याद्वारेच तिने एमपीएससीच्या विविध परीक्षा दिल्या. यातील एका परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मात्र, अन्य परीक्षांमध्येही उत्तम निकालाची तिला अपेक्षा आहे.
निलिमाच्या या यशाबद्दल तिचे, आईचे आणि दोन्ही बहिणी व मामाचं  सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. 

Leave a Reply

You cannot copy content of this page