शिवसेना नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोमिलन अबादीत राहणे हे खरे आव्हान
The real challenge is to maintain unity among Shiv Sena leaders, workers and officials
कोपरगाव शिवसेनेची ताकद आजही निर्णायकच The strength of Kopargaon Shiv Sena is still decisive
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Wed 22 Feb 24, 15.10Pm.By राजेंद्र सालकर
कोपरगाव : कोपरगाव शहरातील शिवसेनेचा इतिहास बघता राज्यात युतीची सत्ता असो आमदार युतीचा असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो आघाडीची सत्ता असो आघाडीचे आमदार असो, खासदार असो निवडणुकीत पोटतिडकीने स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे प्रामाणिकपणे काम करून उमेदवार निवडून आणायची मात्र दोन-तीन महिन्यात या ना त्या कारणापासून त्याच्यापासून फारकत घ्यायची हेच घडत आले आहे. कारण काहीही असो येथील शिवसेना सत्ता असूनही सातत्याने विरोधातच राहिलेली आहे. त्यामुळे केवळ गटागटाने जाऊन निवेदने, आंदोलने करण्यापुरतीच उरली होती. विविध मुद्यांवर आंदोलने करणे आणि त्या पक्षातील लोकांची उणीधुणी काढणे एकमेकांवर कुरघोडी करणे यातून पक्षापेक्षा गटाचे अस्तित्व दाखवणे एवढाच कार्यक्रम गेल्या पाच सहा वर्षापासून शहर शिवसेनेत दिसत होता. त्यादिवशी जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कोपरगावत आले असताना व्यासपीठावर सर्वांचे मनोमिलन झाल्याचे दिसत होते त्याची पुनरावृत्ती सोमवारी शिवजयंती कार्यक्रमात पुन्हा एकदा दिसून आली ही चांगली गोष्ट आहे. आणि हे मनोमिलन खरे असेल तर ते अबाधित ठेवण्याचे खरे आव्हान आहे
परिणामता एकेकाळी जिल्ह्यात कोपरगाव शिवसेनेचे प्रभावी संघटन होते. सामान्य माणूस या पक्षाशी जोडला होता. संभाजी काळे, रावसाहेब सोनवणे त्यानंतर नामदेवराव परजणे यांच्या निवडणुकीत प्रस्थापितांच्या विरोधात प्रथमच सामान्य कार्यकर्ता आमदार होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे लोकांनी पाहिले. ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद,नगरपालिकेत शिवसेनेचे सदस्य कमी होते, पण प्रशासनावर शिवसेनेचा दरारा होता. त्यानंतर शिवसेनेचा ज्यांनी ज्यांनी हात धरला ते कुणी आमदार झाले कोणी खासदार झाले उदाहरण द्यायचे तर अशोक काळे दोनदा आमदार झाले शिवसेनेच्या पाठिंब्याने स्नेहलता कोल्हे यांना प्रथम महिला आमदार होण्याचा मान मिळाला. त्या अगोदर बाळासाहेब विखे, भीमराव बडदे,(भाजप) भाऊसाहेब वाकचौरे, दोनदा सदाशिव लोखंडे हे शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले काळाच्या ओघात गटातटाच्या राजकारणाचा परिणाम येथेही झाला. शहरात माजी आमदार अशोक काळे दोनदा शिवसेनेचे आमदार झाले परंतु त्यांच्यातील व वरच्या वरिष्ठ नेत्यांच्या विसंवादाचा फटका स्थानिक शिवसेनेला बसला.
साखर सम्राट यांचा पट्टा असल्याने सामान्य शिवसैनिकाला कधीही विधानसभा किंवा लोकसभेची निवडणूक लढविण्याची संधी मिळाली नाही किंवा तसा प्रयत्नही कोणा शिवसैनिकांनी कधी केला नाही. सातत्याने या सहकार सम्राट यांच्या विरोधात लढणाऱ्या शिवसैनिकांनी पक्षाचा आदेश म्हणून तडजोड केली प्रामाणिकपणे काम केल तक्रार केली नाही.सातत्याने विजयश्री खेचून आणली. शिवसेनेच्या एक-दोन शिवसैनिकांनी विधानसभा निवडणूक किंवा लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी किंवा इच्छा केली प्रयत्न केला. परंतु त्यांची लोकप्रियता म्हणा किंवा प्रामाणिकपणा म्हणा याबाबत शिवसैनिकांमध्ये साशंकता असल्याने संभाजी काळे , रावसाहेब सोनवणे, किंवा स्व. नामदेवराव परजणे यांच्याप्रमाणे शिवसैनिकात त्यांना तो विश्वास निर्माण करता आला नाही त्यामुळे त्यांना शिवसैनिकांची साथ मिळाली नाही. हे वास्तव आहे. अर्थकारण व पक्षाकडून आयात केले जाणारे उमेदवार यामुळे सर्वसामान्य शिवसैनिक लोकप्रतिनिधी होऊ शकतो हा शिवसैनिकामधील आत्मविश्वासच संपला.
२००२ साली कोपरगावची शिवसेना प्रसिद्धीच्या बुलंद शिखरावर असताना शिवसेनेच्या स्वबळावर राजेंद्र झावरे शिवसेनेचे पहिले जनतेतून लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते. अर्थात त्यावेळी विखे पिता-पुत्र शिवसेनेचे मंत्री होते. शिवसेनेचे माजी उमेदवार स्वर्गीय नामदेवराव परजणे माजी खासदार स्वर्गीय भीमराव बडदे रावसाहेब सोनावणे राजेश परजणे, राजेंद्र जाधव, असे मातब्बर नेते बरोबर होते किरकोळ कुरबुरी व गट तट सोडता निवडणूक म्हणून सर्व शहरातील एकसंघ व जनमानसात ऋतबा व विश्वास निर्माण केलेल्या शिवसेनेची वज्रमूठ होती त्यापूर्वी शिवसेनेचा नगराध्यक्ष यापूर्वीची कै रमेश मोरे यांच्या मदतीने संजय सातभाई शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष झाले त्यानंतर ऐश्वर्या सातभाई, उज्वला जाधव या शिवसेनेच्या नगराध्यक्ष झाल्या होत्या. अनेक जणांना नगरसेवक पदेही मिळालेली आहेत.
बाहेरून येणाऱ्या नेत्यांना आमदारकी खासदारकी मिळाली परंतु इथे पक्षाच्या विस्ताराला खीळ बसली. आमदार अशोक काळे यांना दोनदा शिवसेनेचे आमदार करण्यात स्थानिक शिवसेनेला यश आले. मात्र पुढच्या निवडणुकीत भाजप सेना युती तुटली शिवसेना-भाजप उमेदवार स्वतंत्रपणे एकमेकांसमोर उभे ठाकले यात काही शिवसैनिक आणि आमदार अशोक काळे यांच्यात वितृष्ठ आल्याने शिवसेनेचा मोठा गट काळे यांच्या विरोधात गेला ती दिलजमाई अशोक काळे यांना करता आली नाही. अन्यथा अशोक काळे यांची विजयाची हॅट्रिक झाली असती. कदाचित त्यावेळेस त्यांना मंत्रिपद देखील मिळू शकले असते.
त्यावेळी समन्यायी पाणी वाटप कायदा व कोपरगावच्या पाणी प्रश्नावर शंकरराव कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दिली होती. त्यामुळे अशोक काळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील व तिकीट आणतील अशी अटकळ होती. त्यामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या स्नेहलता कोल्हे यांनी शिवसेना उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले. परंतु ऐन वेळेस स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांचा वरदहस्त असलेल्या मुत्सद्दी राजकारणी अशोक काळे यांनी राजकीय खेळी खेळत शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीची उमेदवारी न करता अशोक काळे यांनी पुन्हा शिवसेनेचे तिकीट घेऊन आशुतोष काळे यांना धनुष्यबाणावर निवडणूक रिंगणात उतरविले. आणि काही तासात शिवसेनेचे तिकीट मिळवू पाहणाऱ्या कोल्हे यांची कोंडी केली आणि शिवसेनेचे तिकीट मिळविण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावले. इथपर्यंत मुत्सद्दी अशोक काळे यांची खेळी यशस्वी झाली. तिकडे दुसरे राजकीय पितामह व मुत्सद्दी राजकारणी असलेले शंकरराव कोल्हे यांनी शह प्रतिशह देत अवघ्या २४ तासाच्या आत स्नेहलता कोल्हे यांच्यासाठी भाजपची उमेदवारी मिळवली विधानसभेच्या सारीपाटावरील गणिते बदलून टाकली.इथेच काळे यांच्या विजयाचे इमले कोसळले. अशोक काळे यांच्यावरील शिवसैनिकांची नाराजी आणि तिकिटाच्या निमित्ताने कोल्हे यांची शिवसैनिकाबरोबर झालेली जवळीक याचा मोठा फायदा स्नेहलता कोल्हे यांना भाजपची उमेदवारी असूनही मिळाला आणि त्या 30000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडणूक जिंकून कोपरगावच्या पहिल्या महिला प्रथम आमदार झाल्या. इथपर्यंत शिवसेनेची किंगमेकर ची भूमिका तालुक्याने मान्य केली होती. विधानसभा निवडून यायचे असेल तर शिवसेनेचा गोल्डन टच हवाच हवा अशी वास्तविकता निर्माण झाली होती. तशी ती आजही तितकीच प्रभावशाली व सत्य आहे. केवळ धागा गुंफण्याची गरज आहे.
पुढे राज्यात पाच वर्ष शिवसेना-भाजप युतीची सत्ता होती राज्याच्या राजकारणात युती असूनही सेना भाजपमध्ये विळ्या भोपळ्याचे नाते निर्माण झाले होते. तरीही या परिस्थितीत व स्थानिक आमदार स्नेहलता कोल्हे या मोठ्या अभिमानाने प्रत्येक सभेत मी शिवसेना भाजप युती व मित्र पक्षाची आमदार असल्याचे जाहीरपणे सांगत होत्या राज्यात सत्ता युतीची केंद्रात सत्ता युतीची स्नेहलता कोल्हे आमदार युतीच्या खासदारही सदाशिव लोखंडे शिवसेनेचा सर्व भगवमय स्थिती असताना आलेल्या नगरपालिका निवडणुकीत स्थानिक शिवसेना नेत्यांना मुसद्दीपणा नसल्याने शिवसेनेच्या या भगव्या परिस्थितीचा व लोकप्रियतेचा म्हणावा तसा राजकीय लाभ उठवता आला नाही नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसैनिकांनी विधानसभेला केलेल्या मदतीमुळे कोल्हे यांचा शिवसेनेला निवडणुकीत चांगली संधी देण्याची इच्छा होती तशी शिवसैनिकांसाठी सुद्धा ही सुवर्णसंधीच होती मात्र पालिका निवडणुकीसंबंधी जागा वाटपाचा तह करताना नेमकं काय हवं हा संभ्रम असल्याने त्यातली त्यात बोलणी करणाऱ्या नेत्यांनी स्वत:ची उमेदवारी पदरात पाडून घेतल्याने पुर्वी निवडुन आलेल्यानाच पुन्हा उमेदवारी मिळाली. यात सामान्य आणि जुना शिवसैनिक अभावानेच होता. या तहाच्या बोलणीत मात्र शिवसेनेला सपशेल अपयश आले पुढे नगरपालिका निवडणुकीत याचा परिणाम असा झाला नगरसेवकांना भरभरून मते पडली परंतु नगराध्यक्ष उमेदवाराला त्या प्रमाणात मते पडली नाहीत त्यामुळे शिवसेना भाजपची स्थिती (कोल्हे गट) की गड आला पण सिंह गेला अशी झाली. जनतेतून अपक्ष उमेदवार निवडून आला बहुमत असूनही शिवसेना-भाजपला विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली. या पराभवातून शिवसेना-भाजपचे नेते आणि कोल्हे काहीतरी बोध घेतील अशी आशा वाटत होती विधानसभा निवडणुकीपूर्वी या सर्व उणिवा भरून काढण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी अपेक्षा होती तब्बल अडीच वर्षाचा दीर्घकाळ असूनही त्या पद्धतीने वेळीच हालचाल झाली नाही नाराजीतून अंतर वाढत गेले अनेकांनी या नाराजीला खतपाणी घातले शेवटपर्यंत दिलजमाई साठी दोन्हीकडून प्रयत्न झाले नाही किंवा आपले वर्चस्व कमी होईल या भीतीपोटी शेवटपर्यंत ही दिलजमाई होऊ दिली गेली नाही.
परिणामतः तालुक्यात विकास कामांची गंगा आणूनही आलेल्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना भाजपाच्या उमेदवार असलेल्या स्नेहलता कोल्हे यांना निसटत्या मतांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवाची कारणमिमांसा करताना अशोक काळेंना ज्याप्रमाणे काही शिवसैनिकांची नाराजी भोवली त्या नाराजीची पुनरावृत्ती स्नेहलता कोल्हे यांच्या पराभवाच्या बाबतीत झाली दोन्ही वेळेस हीच नाराजी निर्णायक ठरली हे सत्य नाकारता येणार नाही.
तरीही नगरपालिकेला कोल्हे यांनी शिवसेनेला नऊ जागा दिल्या पैकी निवडणुकीत शिवसेनेचे ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, योगेश बागुल, अतुल काले, स्वप्ना मोरे, वर्षा शिंगाडे , कालूअप्पा आव्हाड, हे सहा नगरसेवक निवडून आले व कैलास जाधव, अनिल जाधव व उज्वला जितेंद्र रणशुर हे तीन उमेदवार पराभूत झाले त्यानंतर शिवसेनेचे सहा मते व कोल्हे यांचा पाठिंबा यामुळे शिवसेनेचे कैलास जाधव हे स्वीकृत नगरसेवक झाले. त्यामुळे नगरपालिकेत शिवसेनेचे सात नगरसेवक होते. निवडून आल्यावर ते कोल्हेंच्या बरोबर राहिले. संपूर्ण बहुमत असतानाही वाईटपणा कोणी घ्यायचा या प्रवृत्तीमुळे विरोधक म्हणून सेना-भाजप कोल्हे गटाच्या नगरसेवकांना म्हणावा तसा प्रभाव पाडता आला नाही
ग्रामीण भागातील शिवसेनेची स्थितीही फारशी वेगळी नाही. तालुक्यातील प्रत्येक गावात निष्ठावान शिवसैनिक आहेत, पण त्यांचीही अवस्था फारशी वेगळी नाही. राजकीय महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी अन्य पक्षातून सहकारातील मोठी नावे शिवसेनेत प्रविष्ट झाली. त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा वर्गही ओघाने या पक्षात आला. त्यामुळे तेथील मूळचा संघर्ष करणारा, आंदोलनात सहभागी होणारा कार्यकर्ता उपराच राहिला.
स्थानिक शिवसेना नेत्यांनी शिवसेना वाढवण्यापेक्षा आपला गट कसा मजबूत राहील याकडे लक्ष दिले. गटात गटाचे राजकारण ही शिवसेनेसाठी गेल्या पंचवीस तीस वर्षाची कायमची डोकेदुखी ठरली मिटवण्याचा कुठे प्रयत्न झाला नाही त्यामुळे आजतागायत ती धुसफूस आहे तशीच आहे. कुठलीही निवडणूक असो कार्यक्रम असो नेत्याची भूमिका तीच शिवसेनेच्या सदस्यांची भूमिका असते. त्यांच्याकडे पाहतानाही पक्ष म्हणून नव्हे तर कोणत्या गटाचा सदस्य असेच पाहिले जाते, मात्र या सगळ्या राजकारणात मूळचा शिवसैनिक हा पद, प्रतिष्ठेपासून लांबच आहे. पक्ष म्हणून एक संघ राहायचे असेल व्हायचे असेल तर प्रत्येकाला मानपान सोडून थोडे मागे पुढे होऊन संयमाने एकमेकांना सोबत घेतले पाहिजे. येणारा काळ नगरपालिका, विधानसभा,व लोकसभा या निवडणुकीचा काळ आहे.
राज्यात भाजप सेना युती होती तेव्हा शिवसेना कोल्हे बरोबर होती मधल्या काळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस यांची महाआघाडी झाली तेव्हा महाआघाडीचा धर्म म्हणून तेव्हा स्थानिक शिवसेना सोयीस्कर रित्या काळे यांच्या व्यासपीठावर दिसत होती. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्याने आता राज्याच्या सत्तेत भाजपा शिंदे गट आणि अजित पवार गट यांची युती आहे त्यामुळे सध्या तरी उद्धव ठाकरे सेना कोपरगावात स्वतंत्र आहे त्यांना युती किंवा आघाडीचा धर्म पाळण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. थोडक्यात काय तर कोपरगावच्या शिवसेनेला राज्यातील आघाडी आणि युतीचा काही फरक पडत नाही
आजही शिवसेनेची ताकद विजयासाठी निर्णायक ठरणारी आहे मात्र त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्याच्या व्यासपीठावर वरकरणी एकत्र दिसणाऱ्या नेत्यांचे आणि सामान्य शिवसैनिकांचे मनोमिलन अबाधित ठेवण्याचे आव्हान पक्षापुढे व स्थानिक नेत्यापुढे आहे.
चौकट
दोन कार्यालय , ना नेता
शिवसेनेचे कोपरगाव शहरात दोन कार्यालय आहेत. त्याचा उपयोग जनता दरबार म्हणून जनतेचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी किती होतो हा संशोधनाचा विषय आहे शहरात ग्रामीणसाठी तिसरे शिवसेना कार्यालय झाले होते. परंतु अंतर्गत गटबाची मुळे ते औट घटकाचे ठरले. शहर व तालुक्यात शिवसेनेच्या निष्ठावान शिवसैनिकांचा मोठा गट आहे मोठी ताकद आहे वीस ते पंचवीस हजार मतदान आहे परंतु सर्वसमावेशक असा एक नेताही नाही. ज्या त्या भागात तेथील पदाधिकारी गट म्हणून नेतृत्व करतात. निवडणुकीत प्रामाणिकपणे शत प्रतिशत मतात रूपांतर होते हे खरे असले तरी पण आज तरी पक्ष म्हणून येथील शिवसेनेचे एक विस्कळित रूपच पाहायला मिळते.