कोपरगावच्या उमेदवारीचा महायुतीमुळे निर्माण झालेला पेच विवेक कोल्हे कसा सोडविणार ?

 कोपरगावच्या उमेदवारीचा महायुतीमुळे निर्माण झालेला पेच विवेक कोल्हे कसा सोडविणार ?

How will Vivek Kolhe solve the embarrassment of Kopargaon’s candidature due to grand alliance?

त्यांच्या राजकारणाची पुढील दिशा व निर्णय काय  आणि कसा असणार ?What will be the next direction and decision of his politics and how?

Rajendara C. Salkar,News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Mon22July , 18.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : अजित पवार गट महायुतीत आल्याने भाजपमध्ये असलेल्या कोल्हे  यांच्या उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे  हा तिढा सोडविण्यासाठी विवेक कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाणार की उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार ? गेले तर का जाणार ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कोपरगावच्या राजकारणाचा इतिहास  उलगडावा लागेल यात प्रतिस्पर्धी असलेले काळे कोल्हे यांचे कसे महत्त्व आहे त्यात विखे यांचे कसे व किती महत्व आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

कोपरगावचे राजकारण हे मागील अनेक वर्षांपासून कोल्हे विरुद्ध काळे या दोन कुटुंबियांभोवती फिरते. दिवंगत शंकरराव कोल्हे यांचे संपूर्ण राजकारण शरद पवार यांच्यासोबतच घडले.ते ३५ वर्ष आमदार आणि तीनवेळा मंत्रीही राहिले होते. तर दिवंगत शंकरराव काळे हेही काँग्रेसचे नेते होते. १९९१ मध्ये ते कोपरगाव मतदारसंघातून खासदार झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोकराव काळे काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. १९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर शंकरराव कोल्हे यांनी पवारांसोबतच राहणे पसंत केले.
त्यामुळे १९९९ मध्ये शंकरराव कोल्हे यांनी राष्ट्रवादीतून तर अशोकराव काळे यांनी काँग्रेसमधून निवडणूक लढवली. यात कोल्हे यांची सरशी झाली.आणि अशोक काळे यांचा दारूण पराभव झाला. 
पुढे २००४ मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे अशोक काळे यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शंकरराव कोल्हे यांच्या ऐवजी बिपिन कोल्हे यांनी राष्ट्रवादी कडून उमेदवारी लढवली
२००४ आणि २००९ या दोन्हीवेळी अशोक काळे हे मोठ्या मताधिक्याने आमदार झाले. बिपिन कोल्हे यांचा दोन्हीवेळी पराभव झाला. सलग दोनवेळा झालेल्या पराभवाने कोल्हे कुटुंबियांची ताकद कुठेतरी कमी होत होती.  यातूनच सावरण्यासाठी २०१४ मध्ये  शंकरराव कोल्हे यांनी बिपीन कोल्हे ऐवजी स्नेहलता कोल्हे यांना  निवडणूक रिंगणात उतरविण्याचा  निर्णय घेतला यावेळी अशोक काळे यांच्यावरील नाराजीमुळे कोल्हे यांनी शिवसेनेतून लढावे यासाठी स्थानिक पदाधिकारी व कोल्हे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत   बरेच प्रयत्न केले यावेळी अशोक काळे  स्वतः ऐवजी  आशुतोष  काळे यांना  शिवसेनेऐवजी राष्ट्रवादीतून निवडणूक रिंगणात उतरवणार होते परंतु  शिवसेनेतून निवडणूक लढविण्याची कोल्हे यांची खेळी   लक्षात आल्याने अशोक काळे यांनी  रनर आमदार म्हणून  शिवसेनेच्या जागेवर आपला हक्क शाबूत ठेवल्याने  स्नेहलता कोल्हे यांना अगदी शेवटच्या क्षणी भाजपाची उमेदवारी घ्यावी लागली इकडे अशोक काळे यांच्या निवृत्तीनंतर त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी की शिवसेना असे तळ्यात मळ्यात करत अगदी शेवटी क्षणी पुन्हा शिवसेनेकडूनच  निवडणूक लढवली. दरम्यान अशोक काळे यांच्यावरील  नाराजीमुळे शिवसेनेच्या एका गटाने बंडखोरी करून भाजपच्या स्नेहलता कोल्हे यांना उघड उघड  मदत केली शंकरराव कोल्हे यांची  स्नेहलता कोल्हे यांना  उमेदवारी देण्याचे खेळी यशस्वी झाली
आणि तब्बल दहा वर्षांनी जवळपास ३० हजाराच्या मताधिक्याने आमदारकी कोल्हेंच्या घरात परत  आली. आशुतोष काळे यांचा  सुमारे २९ हजार ७६३ मतांनी पराभव झाला.
हे राजकारण एका बाजूला सुरु असतानाच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरच्या राजकारणात उलथापालथ झाली. राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमधून भाजपमध्ये आले आणि तिथूनच विखे पाटील विरुद्ध कोल्हे या कुटुंबातील संघर्षालाही सुरुवात झाली.
२०१९ मध्ये विधानसभेला स्नेहलता कोल्हे यांच्या विरोधात बंडखोरी करून राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश परजणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी १५ हजार ४४६ मते मिळवली परिणामतः  भाजपच्या  स्नेहलता कोल्हे यांचा  अवघ्या ८२२ मतांनी पराभव झाला होता. याला विखे पाटील जबाबदार असल्याचा आरोप कोल्हे समर्थकांनी केला.   परजणे यांना विखेंनीच छुपी मदत केल्याचा आरोप आजही कोल्हेंचे समर्थक करतात.
 याबाबत  वर पक्षापर्यंत तक्रारीही गेल्या इथूनच  विखे कोल्हे  यांच्या तीव्र संघर्ष सुरू झाला कोपरगाव येथील एक दोन कार्यक्रमांमध्ये  विरोधातील महाविकास आघाडीचे आमदार  आशुतोष काळे यांची जबाबदारी आपण घेतली असल्याचे जाहीर वक्तव्य करून विखे यांनी कोल्हेंना डिवचले होते.वाघ म्हटले तरी खातो वाघोबा म्हटले तरी खातो अशी मनाची तयारी करून तिथून विखे पाटील यांचा बदला घ्यायचाच या इर्षेने स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे मैदानात उतरले. भाजपमध्ये असतानाही त्यांनी ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या तत्वाप्रमाणे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याशी हातमिळवणी केली. दोघांनी मिळून  गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने विखे यांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील वर्चस्वाला धक्का देत विखेंकडे असलेला गणेश कारखाना घवघवीत यश मिळवून ताब्यात घेतला.   लोकांनी दहशत झुगारून गुलाल उधळला. त्यातून विखे-कोल्हे वाद आणखीच विकोपाला गेला.दुसरीकडे गणेश कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने   काळे आणि विखे आणखी जवळ आले. दरम्यान साई संस्थान सोसायटी  गेल्या  वीस पंचवीस वर्षापासून  विखे   समर्थकांच्या ताब्यात होती इथे विवेक कोल्हे यांनी आपले पॅनल उभे करून घवघवीत यश मिळवल्याने पुन्हा एकदा विखे यांच्या वर्चस्वाला जोरदार आव्हान दिले होते. याचे शल्य विखे  यांच्या मनात बोचत होते. 
वरती महायुतीत अजित पवार आल्याने  एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले  काळे कोल्हे महायुती म्हणून एकत्र आले.  या महायुतीच्या नव्या समीकरणांमुळे कोपरगावमध्ये महायुतीचे उमेदवार विवेक कोल्हे असणार की, आशुतोष काळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा तिढा  सोडविण्यासाठी  देवेंद्र फडणवीस यांनीही प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने विवेक कोल्हे यांनी नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात नशिब अजमावण्याचा प्रयत्न केला.हे जरी खरे असले तरीही विवेक कोल्हे यांनी अचानक नाशिक शिक्षक मतदार संघात अपक्ष उमेदवारी करून  विखे काळे यांना वचपा काढण्याची आयती संधी मिळवून दिली   भलेही विवेक कोल्हे यांनी या निवडणुकीत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उतरविण्याची वेळ आणून निकराची व चांगली झुंज दिली असली तरीही शेवटी व्हायचे तेच झाले विवेक कोल्हे यांना शिक्षक मतदार संघात सर्वांच्या मदतीनंतरही पराभव स्वीकारावा लागला. कदाचित भविष्यात या पेरलेल्या बीजांचा उपयोग त्यांना होऊ शकेल आज तरी त्यांच्यापुढे आता विधानसभा उमेदवारीचे काय ? प्रश्न तिथेच येऊन उभा राहिला आहे. प्रथमदर्शी काळे किंवा कोल्हे यापैकी एकाला महायुती सोडावी लागणार कारण ज्याचा आमदार त्याची जागा या फार्मूल्यामुळे तिकीट कोणाला हे सांगण्याची गरज नाही? कोपरगाव च्या जागेवर अजित पवार गट अर्थात आशुतोष काळे यांचा दावा राहणार आहे महायुतीचा धर्म म्हणून   विखे  उघड उघड  काळे यांना मदत  करणारच यात शंका नाही  तसे युती धर्मापासून  त्यांना  कुणीही रोखू शकत नाही.आता विधानसभेलाही विखे पाटील हे आपली ताकद आशुतोष काळेंच्या मागे उभी करतील यात शंकाच नाही. सध्या  शहरातील विखे समर्थक एकवटल्याचे व ते आमदार  आशुतोष काळे यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये उघडपणे दिसत असल्याने  त्यांचे मनसुबे काही लपून राहिलेले नाहीत.
परंतु नैतिकदृष्ट्या ही जागा शरद पवार राष्ट्रवादीकडे आहे त्यामुळे  महाविकास आघाडीत   ही जागा शरद पवार गटाकडे आहे  महाविकास आघाडी विरुद्ध महायुती  अशी विधानसभेला  सरळ सरळ थेट लढाई  झाल्यास राज्यातील अनेक मतदारसंघातील  उमेदवारांचे मतदार संघ गोठले जाणार आहेत या वस्तुस्थितीचा विचार करता   विवेक कोल्हे यांना भाजप म्हणून महायुतीतून संधी  मिळेल का ? हे मोठे प्रश्नचिन्ह आहे. कोपरगावची जागा फार्मूल्यानुसार शरदचंद्र पवार गटाकडे आहे परंतु प्रसंगी अदलाबदलीत ही जागा उद्धव ठाकरे शिवसेनेला सुद्धा मिळू शकते प्रश्न फक्त एवढाच  आहे की, उद्धव ठाकरे की शरद पवार ? आता विवेक कोल्हे नेमके काय भूमिका  घेणार , हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परंतु जे काही करायचे त्याबाबतीत त्यांना तातडीने निर्णय घ्यावा लागेल हे मात्र निश्चित ! 
तसे आमदार आशुतोष  काळे यांच्या बाबतीत सर्व ऑलवेल आहे असे म्हणता येणार नाही मागच्या २०१९ च्या निवडणुकीत विखे यांची सर्व ताकद प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आशुतोष काळे यांच्याच मागे होती सर्वजण कोल्हे विरोधात  एकवटले असताना सुद्धा अवघ्या ८२२  मतांनी काळे यांना विजय मिळाला होता. आज महाविकास आघाडीचा विचार करता ही जागा शरदचंद्र पवार गटाकडे आहे त्यामुळे  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने तगडा  उमेदवार उभा केला किंवा अदलाबदलीत ही जागा ठाकरे शिवसेनेला दिली. तर ते टेन्शन आशुतोष काळे यांना देखील राहणार आहे त्यामुळे काळे असो की कोल्हे दोघांनीही आपले  हुकूमाचे पत्ते सध्या तरी  झाकून ठेवले आहेत आज काळे कोल्हे दोघेही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेताना दिसून येत आहे.
कोपरगाव मतदार संघात सध्या सुरू असलेल्या चर्चेचा हा घेतलेला मागोवा आहे. परंतु  एक मात्र खरे की, विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत कोपरगावच राजकारण मोठे गमतीशीर ठरणार आहे यात शंकाच नाही.

Leave a Reply

You cannot copy content of this page