निमित्त आप्पांच्या पुतळ्याचे ; नव्या राजकीय समीकरणाची नांदी
The occasion of Appa’s statue; the beginning of a new political equation
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काळे कोल्हे विखे तिरंगी लढत दिसणार का?
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun20July 20.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव: स्थानिक स्वराज्य संस्थांचे बिगुल वाजले असून या निवडणुकीच्या तोंडावर कोपरगाव नगरपालिकेसह जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे.
शनिवारी स्वातंत्र्य सेनानी माधवराव कचेश्वर आढाव यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजनाचे निमित्त जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री असताना आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांची अनुपस्थिती तर व्यासपीठासह कार्यक्रमाला विखे समर्थकांची मोठी उपस्थिती हा मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
आगामी नगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि शहरातील मान्यवर नेते यांच्यातील ही जवळीक नव्या राजकीय बंधनाचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे.
कोपरगाव मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय परिस्थितीचा विचार करता काळे आणि कोल्हे यांच्यातच सातत्याने लढाई झालेली आहे. विखे समर्थकांची संख्या देखील कोपरगावात मोठी आहे शनिवारी विखे यांच्या हस्ते कोपरगावात ठिकठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले . या कार्यक्रमामुळे विखे समर्थक चार्ज झाल्याची चर्चा शहरात सुरू होती यापूर्वीही काहीं जणांनी वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार राधाकृष्ण विखे यांना कोपरगाव मध्ये आणून कोल्हेंना डिवचण्याचे काम केलेले आहे परंतु कालचा कार्यक्रम हा सर्वार्थाने वेगळा होता या कार्यक्रमात व्यासपीठावर बिपिन कोल्हे व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सातत्याने चर्चा होताना दिसत होती समवेत माजी आमदार अशोक काळे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. असे असले तरीही आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांची अनुपस्थिती मात्र खटकणारी व चर्चेचा विषय ठरली. यामुळे आपसूकच विखे समर्थकांच्या काहीशा आशा पल्लवीत झाल्या आहेत. असे असले तरीही यावेळी मात्र नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हे असो की काळे यांच्यावर बोलणे कटाक्षाने टाळले विशेष म्हणजे बिपिन कोल्हे यांनी पाणी प्रश्नावर केलेली मागणी देखील त्यांनी मान्य केली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड देखील झाला आहे.
कोपरगाव मध्ये विखेच्या रूपाने तिसरी शक्ती येऊन स्थानिक स्वराज्य मध्ये तिरंगी लढत व्हावी अशी अनेकांची सुप्त इच्छा लपून राहिलेली नाही अनेक वेळा याचा प्रत्यय देखील कोपरगावकरांना आलेला आहे.
माधवराव आप्पा यांच्या पुतळ्याचा भूमिपूजन समारंभाच्या निमित्ताने विजय आढाव व संपूर्ण आढाव परिवाराने शहरातील सर्वांना एकत्र आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र विखे समर्थक मोठ्या संख्येने हजर होते त्यामानाने कोल्हे व काळे यांचे कार्यकर्ते फारसे दिसले नाहीत.
नामदार विखे कोपरगावात येणार या संधीचा फायदा घेत भारतीय जनता पार्टी, वसंत स्मृती कार्यालय – कोपरगाव स्व. खा. सूर्यभानजी पा. वहाडणे प्रतिष्ठान यांच्यावतीने आणीबाणीत ज्यांनी तुरुंगवास भोगला त्या संघ, जनसंघ व भारतीय जनता पार्टीसाठी निष्ठेने समर्पित कार्यकर्त्यांचाही सन्मान विखे यांच्या हस्ते करण्यात आला व्यापारी धर्म शाळेत झालेल्या या कार्यक्रमास देखील जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांचीच मोठी संख्या होती.
आणखी खोलात जाऊन राजकीय समीकरणाचा विचार केल्यास जनतेतून नगराध्यक्ष असल्याने अनेक जण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत.
काळे आणि कोल्हे या दोन्ही नेत्यांचे असणारे राजकीय स्थान, सामाजिक ताकद आणि पाठिशी असणारी मतांची आकडेवारी पाहता या दोन नेत्याकडे असलेली कार्यकर्त्यांची व इच्छुकांची फौज पाहता आपली वर्णी लागेल का ? भीतीपोटी कोपरगाव मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी होताना दिसत आहे. या बदलांचे संकेत स्पष्टपणे जाणवत आहेत. त्यांची ही राजकीय जवळीक आणखी कुठपर्यंत जाते हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
चौकट
सध्या राज्य सरकारमध्ये काळे कोल्हे विखे हे एकाच युतीमध्ये आहेत परंतु प्रत्येकाला मतदार संघात आपआपले वर्चस्व हवे आहे यामुळे कोपरगावात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी काळे कोल्हे विखे अशी तिरंगी लढत दिसणार की अनेकांनी बांधलेले इमले कोसळणार हे मात्र येणारा काळ ठरवेल !
Post Views:
92





