पोहेगाव व जवळके या दोन्ही गावांचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये समावेश
Both the villages of Pohegaon and Jabalke are included in Kopargaon Taluka Police Station.
गृहविभागाचा हिरवा कंदील : आजी-माजी आमदारांच्या प्रयत्नांना यश
कोपरगाव :गृहविभागाने सोमवारी पोहेगाव खुर्द व बुद्रुक आणि जवळके या कोपरगाव मतदार संघातील दोन्ही गावांचा समावेश कोपरगाव तालुका पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली असल्याची माहिती आजी-माजी आमदार यांच्याकडून प्रसिद्धी पत्रकारद्वारे देण्यात आली आहे.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव खुर्द व बुद्रुक आणि जवळके या शिर्डी पोलीस स्टेशनला जोडण्यात आलेल्या दोन्ही गावांचा समावेश कोपरगाव पोलीस स्टेशन मध्ये करावा यासाठी सुरू असलेल्या सततच्या प्रयत्नांना यश आले आहे. असा दावा आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे या आजी-माजी आमदारांकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पोहेगाव खुर्द व बुद्रुक आणि जवळके ही दोन मोठी गावे आहेत. आजमितीस या दोन्ही गावांसाठी राहाता मतदार संघातील शिर्डी पोलिस ठाणे कार्यरत असून, कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव व जवळके या गावातील नागरिकांना सुरक्षा व इतर बाबीसाठी शिर्डी पोलीस स्टेशनला चकरा माराव्या लागत होत्या. श्री साईबाबा या जागतिक कीर्तीच्या शिर्डी नगरीतील पोलीस ठाणे राजकीय व्यक्ती, सेलिब्रिटी यांचा बंदोबस्त यासह कायदा व सुरक्षेच्या दृष्टीने शिर्डी पोलीस ठाणे अतिशय व्यस्त असल्याने नागरिकांना वारंवार चकरा मारून देखील कामासाठी खूप दिरंगाई होत मुळात कोपरगाव तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने शिर्डी पोलीस स्टेशन गैरसोयीचे असल्यामुळे या दोन्ही गावांचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये समावेश व्हावा अशी अनेक दिवसांची मागणी नागरिकांनी सातत्याने आजी-माजी आमदारांकडे केली होती. शिर्डी या पोलिस ठाण्यांवरील पोहेगाव खुर्द व बुद्रुक आणि जवळके या दोन्ही गावांचा कार्यभार कमी करावा याविषयीचा आजी-माजी आमदारांनी पाठविलेला प्रस्ताव गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित होता.
यासाठी आमदार आशुतोष काळे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी वरील दोन्ही गावांचा कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये समावेश व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत पोलिस ठाण्याच्या समावेशासाठी विनंती केली होती. पोलिस प्रशासनाकडून देखील याबाबत गृहविभागाकडे पाठपुरावा सुरू होता. अखेर आज शासनाने वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पोहेगाव खुर्द व बुद्रुक आणि जवळके या दोन्ही गावांचा कोपरगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये समावेश करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.
चौकट
कोपरगाव पोलिस ठाण्यात समावेशाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तो त्रास आता कमी होणार असून
या दोन्ही गावाच्या परिसरातील गुन्हेगारीत निश्चितच मोठी घट होणार आहे.- आ. आशुतोष काळे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ,
चौकट
कोपरगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, दीर्घकाळच्या मागणीला अखेर न्याय मिळाला असून दीर्घकाळच्या त्रासाला पूर्णविराम मिळाला आहे.- माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कोपरगाव विधानसभा मतदारसंघ





