शेतकरी  हिताला प्राधान्य देऊ; योग्य वेळी ऊस दराचा निर्णय घेऊ – आ. आशुतोष काळे

शेतकरी  हिताला प्राधान्य देऊ; योग्य वेळी ऊस दराचा निर्णय घेऊ – आ. आशुतोष काळे

We will give priority to the welfare of farmers; We will decide on sugarcane prices at the right time – MLA Ashutosh Kale

कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचा ७१ वा गळीत हंगाम शुभारंभ

 Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Fir31Oct 19.45 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणता कारखाना किती ऊसदर देतो याची आमच्याशी स्पर्धा नाही. आपण योग्य वेळी, योग्य निर्णय घेऊन नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण ठेवले आहे. अशी ग्वाही कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी दिली.

सन २०२५–२६ या वर्षाच्या ७१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला. या वेळी आ. काळे बोलत होते.
ते म्हणाले, “राज्य शासनाने १ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी सलग पावसामुळे ऊसशेतीत पाणी साचले आहे. त्यामुळे प्रारंभी साखर उतारा कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र चांगल्या पिकामुळे उद्दिष्टापेक्षा अधिक गाळप करण्याची क्षमता आपल्याकडे आहे.”

काळे पुढे म्हणाले, “या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सर्व बंधारे आणि कालवे पाण्याने भरलेले आहेत. गोदावरी कालव्यांना ४ ते ५ रोटेशन मिळतील असा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस लागवड करावी. कांदा व इतर पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी ऊस हे स्थिर उत्पन्न देणारे पीक ठरणार आहे.”

साखर निर्यातीबाबत ते म्हणाले, “मागील वर्षी केंद्र सरकारने १० लाख मेट्रिक टन निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु प्रत्यक्षात ८ लाख मेट्रिक टनच निर्यात झाली. या वर्षी साखर उत्पादन १८ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कायमस्वरूपी साखर निर्यात धोरण आखावे, अशी मागणी आम्ही करत आहोत.”

काळे यांनी सांगितले की, कारखान्याने उत्पादन खर्च कमी करून, अधिक गाळप करून हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे यांनी केले, सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे, तर आभार उपाध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी मानले.
या वेळी एकरी १०० टन ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

चौकट 
कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने कधीही कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस असा भेदभाव केला नाही. मागील वर्षी कार्यक्षेत्राबाहेरील ऊसालाही ३१०० रुपये दर दिला. त्यामुळे यंदाही बाहेरील शेतकऱ्यांचा ऊस मोठ्या प्रमाणात कारखान्याकडे येईल.

चौकट
पुढचा काळ निवडणुकीचा असून, तयारीला लागा; आपण विजय मिळवणारच आहोत. विरोधकांनी चाळीस वर्ष सत्तेत राहूनही दाखवायला काहीच नाही. मंजूर बंधाऱ्यांची दुरवस्था ही त्यांच्या अकार्यक्षमतेची साक्ष आहे, असा परोक्ष टोला आ. आशुतोष काळे यांनी लगावला.

Leave a Reply

You cannot copy content of this page