संवत्सर गोदावरी पूल धोकादायक; वाहतूक बंद- प्रशासन झोपले का?

संवत्सर गोदावरी पूल धोकादायक; वाहतूक बंद- प्रशासन झोपले का?

Samvatsar Godavari bridge is dangerous; Traffic closed – Did the administration sleep?

नागरिकांचा प्रश्न : पूल कोसळेपर्यंत जाग येते का?

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat1Nov 20.00 Pm.By  सालकर राजेंद्र 

 

कोपरगाव, :संवत्सर येथील गोदावरी नदीवरील जुना पूल मोठ्या भगदाडामुळे आजपासून अनिश्चित काळासाठी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे.छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा निर्णय घेतला असून वाहनधारक, विद्यार्थी, शेतकरी आणि मजुरांचे हाल सुरू झाले आहेत.

 गेल्या काही दिवसांपासून पुलावर मोठे खड्डे पडले होते. स्थानिकांनी तक्रारी केल्या, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केले, पण प्रशासनाने कानावर हात ठेवले! अखेर पूल धोकादायक ठरल्यानंतरच वाहतूक बंद करण्याचा निर्णय — म्हणजेच “घोडं पळालं की पोलीस जागा!”

 अचानक बंदीमुळे सर्व वाहने कोकणठाण चौफुली–बेट–संजीवनी कारखाना मार्गे वळवावी लागत आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढला असून इंधनखर्चही तिप्पट झाला आहे. शाळकरी मुले, शेतकरी आणि कामगार यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

संवत्सर मार्ग बंद झाल्याने नगर–मनमाड महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. आधीच या महामार्गावर अपघात व कोंडीचे प्रमाण जास्त असून, परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

“रस्ते खड्ड्यात, पूल भगदाडात आणि आमचे नेते आश्वासनांच्या पुलावर!”  नागरिकांचा संताप ओसंडून वाहत आहे. वेळीच तपासणी व दुरुस्ती झाली असती, तर आज हा पूल बंद करण्याची वेळ आली नसती, असा आरोप जनतेकडून होत आहे.

नागरिकांची मागणी,पुलाची तातडीने तपासणी व दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू करावी,पर्यायी मार्गावर दिशादर्शक फलक व वाहतूक नियंत्रण ठेवावे,विद्यार्थी व शेतकऱ्यांसाठी विशेष वाहतूक सुविधा द्याव्यात.

संवत्सर पुलावरील भगदाडाने प्रशासनाची निष्काळजीपणा उघड केला आहे. जोपर्यंत ही बेफिकिरी संपत नाही, तोपर्यंत पुलांसोबतच जनतेच्या आशाही कोसळत राहतील!

Leave a Reply

You cannot copy content of this page