कोपरगावात सत्ता नव्हे, वर्चस्वाची लढत!
In Kopargaon, it’s not a fight for power, but for dominance!
नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची लगबग; दिवाळीनंतर जनसंपर्क मोहिमांना वेग — काळे विरुद्ध कोल्हे आमनेसामने
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun2Nov 15.20 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : रखडलेली नगरपरिषद निवडणूक डिसेंबरअखेर होण्याची शक्यता निर्माण होताच नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. सहकार, साखर उद्योग, शिक्षण आणि धार्मिक केंद्र असलेल्या कोपरगावावर सर्वच पक्षांची नजर आहे. वाढते शहरीकरण आणि मतदारसंघातील मोठा मतदारवर्ग लक्षात घेता सत्ता मिळवण्यासाठी पक्षांनी जनसंपर्क मोहिमा आखण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर गाठीभेटींना वेग आला आहे.
कोपरगाव मतदारसंघात ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेपर्यंत ‘काळे-कोल्हे’ गटाचा प्रभाव कायम राहिला आहे. २०१७ च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार नगराध्यक्ष झाला होता, तर शिवसेना- भाजप यांचे बलाबल होते आमदार काळे गटाचे सहा नगरसेवक होते. तरीही सत्ता संतुलनाची जोरदार चुरस पाहायला मिळाली होती. यामुळे कोपरगावचे राजकारण कायम चर्चेत राहिले आहे.
नगराध्यक्षपदासाठी पराग संधान आघाडीवर
कोपरगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपचे अमृतसंजीवनी चेअरमन पराग संधान हे सध्या आघाडीवर मानले जात आहेत. शहरातील विविध सण-उत्सव, कार्यक्रमांचे नियोजन, कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि समस्या सोडविण्याच्या भूमिकेमुळे त्यांची शहरात मजबूत ओळख निर्माण झाली आहे.
कोल्हे परिवाराशी जवळीक असल्याने त्यांच्यात आणि जनतेत समन्वय साधण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षांत प्रत्येक प्रभागात जनसंपर्क वाढवत त्यांनी स्वतःला “ग्रासरूट” पातळीवर लोकप्रिय केले आहे. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिल्याने ते पक्षात विश्वासार्ह चेहरा ठरले आहेत.यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नगराध्यक्षपदासाठी पराग संधान यांच्याबद्दल प्रचंड अपेक्षा असून, कोल्हे गटानेही त्यांना संभाव्य उमेदवार म्हणून पुढे केल्याचे दिसते.दरम्यान, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे व माजी नगराध्यक्ष कै.बबनराव वाजे यांचे चिरंजीव दीपक वाजे हेही इच्छुक आहेत, मात्र सध्या पराग संधान हे भाजपमधील सर्वाधिक चर्चेतले दावेदार ठरत असल्याने भाजपमध्ये तेच सध्या “हॉट फेव्हरेट”.
नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र झावरे पुन्हा रिंगणात
माजी नगराध्यक्ष व उद्धव ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे यांनी नगराध्यक्षपदासाठी पुन्हा तयारी सुरू केली आहे. पुन्हा एकदा निवडणूक लढविण्याची व्यक्त केलेली इच्छा प्रत्यक्षात उतरवत त्यांनी आरक्षण जाहीर होताच उमेदवारी जाहीर केली असून शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांच्या भेटीगाठींना वेग दिला आहे. आपल्या कार्यकाळातील ठोस नियोजन, प्रशासनावर पकड आणि उभारलेल्या विकासकामांच्या बळावर ते पुन्हा संधी मागत आहेत. दरम्यान, माजी शहरप्रमुख भरत मोरे हेही इच्छुक असून त्यांनीही प्रचार सुरू केला आहे. जिल्हाप्रमुख सचिन कोते हे दोन्ही गटांना एकत्र आणून शिवसेनेचा मजबूत पॅनल उभा करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोपरगाव पालिकेतील ही लढत शिवसेनेत रंगत आणणारी ठरण्याची चिन्हे आहेत.
अपक्ष वहाडणे पुन्हा मैदानात
“आजवर कोणत्याही नगराध्यक्षांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीचा लेखाजोखा पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध केलेला नाही. मी ती पुस्तिका तयार केल्याचा दावा करीत माजी अपक्ष नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पुन्हा नगराध्यक्षपदाची सुप्त इच्छा प्रकट केल्याचे बोलले जात असून, आगामी निवडणुकीत ते प्रमुख दावेदार म्हणून दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे . दरम्यान, ते आमदार आशुतोष काळे आणि तिसरी शक्ती विखे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते.”
काँग्रेसकडून माजी नगरसेवक बाबुराव पैलवान यांनी देखील उमेदवारीसाठी शड्डू ठोकले आहेत.
तसेच माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पाटील शहरभर वैयक्तिक गाठीभेटी घेत नागरिकांशी संवाद साधत असून, स्वतःला प्रभावी व मजबूत दावेदार म्हणून पुढे करत आहेत.
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दावेदारांची धावपळ!
कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये उमेदवारीची चुरस शिगेला पोहोचली आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या गटातच सत्तेची रस्सीखेच पेटली असून दावेदारांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.
मंदार पहाडे हे सुरुवातीपासूनच प्रमुख दावेदार मानले जात होते, मात्र आरक्षणानंतर त्यांनी आपल्या आईसाठी उमेदवारीचा दावा पुढे केल्याची चर्चा आहे. त्याचवेळी माजी नगरसेवक व शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनीही “कठीण काळात आपण काळे परिवारासोबत उभे राहिलो, आता वेळ आमची” असा ठाम दावा करत आपली मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, माजी नगरसेवक दिनार कुदळे आणि विरेन बोरावके या माळी समाजातील प्रभावी कार्यकर्त्यांची नावेही चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या काळे गटातच उमेदवारीसाठी सुरू झालेल्या या राजकीय शर्यतीमुळे पक्षात तणाव वाढला असून नगराध्यक्षपदाची लढत चुरशीची होणार, हे आता निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादी (शरद पवार गट) — वर्पेंची ‘वेट अँड वॉच’ भूमिका
जिल्हाप्रमुख संदीप वर्पे यांनी आघाडी धर्म जपला असला तरी नगराध्यक्षपदाबाबत अद्याप पत्ते उघडलेले नाहीत. मात्र, आघाडीत बिघाडी झाली तर पक्ष आदेशानुसार स्वतःचा स्वतंत्र पॅनल तयार करण्याची त्यांची तयारी दिसून येते.
शिंदे गटाची सिंहगर्जना — ‘युती धर्म नसेल तर स्वतंत्र लढणार!’
एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे — “युती धर्म पाळला नाही, तर आम्ही स्वतंत्र लढू!” त्यांनी नगराध्यक्ष पदासह संपूर्ण पॅनलची आखणी सुरू केली असून संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि नव्या प्रवेशांनी वातावरण तापवले आहे.
कोपरगावमध्ये येणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीत महायुती व महाआघाडी अशी सरळ लढत होण्याची शक्यता अत्यल्प दिसते. कारण सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे,आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नितीन औताडे, हे तिघेही महायुतीतील प्रमुख नेते आहेत. त्यामुळे एकाच पॅनेलखाली सर्वांना एकत्र आणणे आणि नगराध्यक्षपदासाठी एकच उमेदवार ठरवणे हे कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील समझोता एक्सप्रेस इतके सोपे नाही तसे घडणे म्हणजे एक दिव्यच आहे.
प्रत्येक गटाचे स्वतःचे प्रभावक्षेत्र आणि राजकीय अजेंडा असल्याने “महायुतीचा चेहरा” कोण असेल, यावर एकमत होणे जवळपास अशक्य वाटते.
महाआघाडीत नेतृत्वाचा गोंधळ
उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राहुल गांधीची काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन घटक महाआघाडीत असले तरी आघाडीत सध्या स्पष्टता नाही. काँग्रेसकडून दमदार दावेदार नसताना राष्ट्रवादीनेही अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी कोणाला प्रथम पसंती द्यायची, हा प्रश्नच ( तिढा )अद्याप निर्माण झालेला नाही.
कोपरगाव नगरपालिका निवडणुकीत महायुती किंवा महाआघाडी या आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जाण्याची शक्यता सध्या दिसत नाही. कोणत्याही आघाडीच्या तयारीच्या किंवा चर्चेच्या हालचाली होतांना दिसत नाहीत. त्यामुळे ‘महायुती’ किंवा ‘महाआघाडी’च्या चेहऱ्याच्या रूपात एखाद्या नेत्याच्या नावाला संमती दिल्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. स्थानिक स्तरावर प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे तयारी करत असल्याचेच चित्र दिसते.
नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये इच्छुकांची लगबग वाढली असून सध्या प्रत्येक पक्षातील दोन किंवा अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने सर्व काही ऑलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहेत. मात्र, हे मतभेद मिटवून पक्षाची एकसंघ ताकद उभारण्यासाठी क्रमशः या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी काळे–कोल्हे आणि मातोश्री चा आदेश पुरेसा ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. शेवटी “नेते ठरवतील, तोच उमेदवार अंतिम ठरेल”, असा सूर कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीची रंगत वाढली —पावर गेम चा विचार करता काळे विरुद्ध कोल्हेच आमनेसामने
विधानसभा निवडणुकीतील एकतर्फा यशानंतर आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कोपरगाव नगरपरिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.तर दुसरीकडे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षही नगरपालिकेची सत्ता कायम राखण्यासाठी जय्यत तयारीत आहे. शिवसेना (शिंदे गट) महायुतीचा धर्म पाळत स्वतंत्रपणे लढण्याच्या तयारीत आहे, तर कोपरगावात महायुती वा महाविकास आघाडीच्या स्वरूपात निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. शेवटी पावर गेम चा विचार करता काळे कोल्हे हेच आमने-सामने दिसतील.
मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले, तर स्थानिक पातळीवरही शिवसेना (उद्धव ठाकरे गट) व मनसे युतीची शक्यता नाकारता येत नाही. रिपब्लिकन पार्टी (A) मात्र काळे आणि कोल्हे या दोघांच्याही सोबत असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, शरद पवार गटाचा राष्ट्रवादी पक्ष जुना असला तरी कोपरगावच्या राजकारणात नवीन असल्याने नगराध्यक्षपदासाठी त्यांचा ठोस चेहरा अद्याप समोर आलेला नाही.
कोपरगावमध्ये सत्ता कोणाच्या बाजूने झुकते हे आगामी राजकीय समीकरणांवर अवलंबून राहणार आहे.
कोपरगावच्या राजकारणात आता पक्षांपेक्षा व्यक्तिमत्त्वांची ताकद आणि त्यांच्या वैयक्तिक समीकरणांचीच चढाओढ ठळकपणे दिसू लागली आहे. भाजप, उद्धव ठाकरे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी, हे तिन्ही प्रवाह आपापल्या आंतरिक गटबाजीच्या दलदलीत अडकलेले असतांना मतदार मात्र शांतपणे राजकीय रंगमंच पाहत आहेत. अशा पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे, विवेक कोल्हे आणि उद्धव ठाकरे यांचा एकेक निर्णय कोपरगावच्या भविष्यातील सत्तासमीकरण ठरवणार आहे. पुढील काही आठवड्यांत ज्या दिशेने त्यांची पावले वळतील, त्याच दिशेने आणि त्याच क्षणी कोपरगावच्या सत्तेचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.
कोपरगावच्या राजकारणात आता खेळ सत्तेचा नाही, तर वर्चस्वाचा आहे. भाजप, शिवसेना (उद्धव ठाकरेगट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) , तिन्ही छावण्यांत उमेदवारांची चढाओढ तापली असली, तरी एकजूट कुणाकडेच नाही. आशुतोष काळे, विवेक कोल्हे आणि उद्धव ठाकरे यांचा पुढचा डावच ठरवेल, कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल आणि कोण हात चोळत पाहत राहतो!
म्हणूनच, कोपरगावच्या राजकारणात येत्या नगरपालिका निवडणुकीत कोणाचा पलडा जड ठरणार, कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण नगराध्यक्षपदावर विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये होणारे बदलच कोपरगावच्या नेतृत्वाचा निर्णायक निकाल ठरवतील.
कोपरगावात आता खेळ सत्तेचा नाही, तर वर्चस्वाचा आहे!
Post Views:
157