जंगुशेठ अजमेरे’ यांचा आदर्श पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी” — आ. आशुतोष काळे
“The ideal of ‘Jangusheth Ajmere’ is an inspiration for the next generation” — A. Ashutosh Kale
“जंगुशेठ अजमेरे चौका’चे नामकरण त्यांच्या योगदानास मानाचा मुजरा!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon3Nov 16.40 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : “जंगुशेठ अजमेरे यांनी आपल्या कार्यातून शहरासाठी जे काही केलं, ते आजही आदर्शवत आहे. त्यांनी रस्ते, सुविधा आणि विकासकामांमधून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांच्या काळातील रस्ते आजही टिकून आहेत, हेच त्यांच्या प्रामाणिकपणाचं आणि निस्वार्थ सेवाभावाचं प्रतीक आहे,” असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.
सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी कोपरगांव शहराचे लोकप्रिय मा. नगराध्यक्ष, स्वातंत्र्यसैनिक कै. जंगुशेठ (उत्तमचंद) अजमेरे चौक नामकरण व फलक अनावरण सोहळ्यात बोलत होते.
आ. काळे पुढे म्हणाले, “अजमेरे शेठ यांचा कार्यकाल हा आदर्शाची शिदोरी आहे. पुढच्या पिढ्यांनीही प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे आणि जनसेवेला केंद्रस्थानी ठेवून काम केलं पाहिजे. त्यांच्या कार्याची आठवण पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांच्या स्मृतीत झालेलं हे नामकरण म्हणजे त्यांच्या कार्याचा सन्मान आहे.”
“अजमेरे शेठ यांच्या आदर्शावर चालत कोपरगाव व मतदारसंघाच्या विकासासाठी अधिक चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील,” अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
“संस्कार, प्रामाणिकपणा आणि कार्यशीलतेचा आदर्श – बिपिन कोल्हे”
कोपरगाव : “भाऊसाहेब फिरोदिया, स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेस परंपरेतून कोपरगावाला मिळालेली कार्यसंस्कृती आजही प्रेरणादायी आहे. त्या संस्कारातून घडलेले नेते म्हणजे कैलासवासी जंगुशेठ अजमेरे त्यांच्या स्मृतिचौकाचे उद्घाटन हा केवळ सन्मान नव्हे, तर मूल्यांचा पुनर्जागरण क्षण आहे,” असे प्रतिपादन उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “त्या काळात पायाभूत कामे म्हणजेच विकासाचे खरे प्रतीक होते. नफ्याच्या नाही, तर सेवाभावाच्या भावनेने काम करणारे ते नेते होते. दिलीप शेठ यांच्यासारख्या वारसदार आजही त्या परंपरेला जागून कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिक सेवा केली आहे.”
“या पिढीने त्या जुन्या कार्यसंस्कारांकडून शिकण्याची गरज आहे. गावासाठी जगणे, चौकाचौकात कामाचा आत्मा जपणे – हाच खरा श्रद्धांजलीचा मार्ग आहे,” असेही कोल्हे म्हणाले.
राजेश परजणे म्हणाले, ज्यांनी आदर्श घालून दिला, त्या नावातच एक जादू होती. त्यांनी घडवलेला आदर्श म्हणजे केवळ तालुक्याचं नव्हे, तर पिढ्यांचं मार्गदर्शन, राजकारण त्यांच्या आयुष्याचा एक भाग होता, पण समाजासाठीचं त्यांचं व्रत अखंड होतं. आज नगरपालिकेने त्यांच्या स्मृतीला सन्मान देत नाव दिलं, ते फक्त फलकावरचं अक्षर नाही, ती एका युगाची ओळख आहे. येणारा-जाणारा प्रत्येक जण जेव्हा ते नाव वाचेल, तेव्हा त्या कार्याचा, त्या त्यागाचा आणि त्या प्रेरणेचे स्मरण करेल !
श्रीमान गोकुळचंद थोडे विद्यालयात झालेल्या सोहळ्याला आ. आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे, ज्येष्ठ नेते दत्तू नाना कोल्हे, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, महानंदाचे माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, कैलासशेठ ठोळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, अमृत संजीवनी चे चेअरमन पराग संधान, राष्ट्रवादी शरद पवार जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र झावरे, संजय सातभाई, विजय बंब, शोभनाभाभी ठोळे, उत्तमभाई शहा, दिलीप अजमेरे परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवर व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गोरे सर यांनी केले तर शेवटी आभार डॉ. अमोल अजमेर यांनी मानले.
Post Views:
38






