“महाविकास आघाडीच आमचा धर्म — तिसरा पर्याय आम्हीच दाखवणार!”- संदीप वर्पे
“Mahavikas Aghadi is our religion — we will show the third option!”- Sandeep Varpe
शरद पवारांचा विचार, उद्धव ठाकरेंची निष्ठा, काँग्रेसचा संस्कार; या तिन्हींच्या संगमातून नवा राजकीय मार्ग आखणार
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon3Nov 23.00 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगावात नगरपरिषदेच्या निवडणुकीत सत्तेच्या खुर्चीसाठी सुरू असलेल्या युद्धात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे यांनी आता थेट रणशिंग फुंकलं आहे. “आमच्यासाठी पहिली आणि शेवटची पसंती महाविकास आघाडीच आहे. पण जर मित्रपक्षांनी पाठ फिरवली, तर आम्हीही तिसरा पर्याय दाखवायला तयार आहोत,” असा रोखठोक आणि राजकीय दणका वर्पे यांनी दिला आहे.
सोमवारी ३ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी हॉटेल पॉम पॅराडाईज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात शरद पवार गटाच्या भूमिकेबाबत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांची शरद पवार गट अहिल्यानगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्या बद्दल शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला
स्वागत तालुकाध्यक्ष बापू रांधवणे, यांनी तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष तानाजी जाधव यांनी केले.
आपली भूमिका जाहीर करतांना ते पुढे म्हणाले,“शरद पवार साहेबांचा विचार, उद्धव ठाकरेंची निष्ठा आणि थोरात साहेबांचा संस्कार घेऊनच आम्ही चाललो आहोत. पण आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार असेल, तर आम्हालाही आमचा पक्ष वाढवायचा अधिकार आहे.”
महाविकास आघाडीतील काही मित्रपक्षांनी ‘स्वबळा’ची गर्जना केली असली, तरी वर्पे यांनी संयम राखला आहे. मात्र संयमाचा अर्थ दुर्बलता नाही, हा संदेश त्यांनी या भाषणातून स्पष्ट दिला.
“स्वबळावर लढायची ताकद आमच्यातही आहे. पण महायुतीच्या पैशाच्या, सत्तेच्या आणि यंत्रणेच्या खेळात उतरण्यासाठी विरोधकांनी महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र यायला हवं, नाहीतर लोकशाहीचा खेळ एकतर्फा होईल,” अशी थेट शब्दात त्यांनी फटकारणी केली.
निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी विरोधात बोलण्यासारखा बरेच काही यात प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, तालुक्यातील खड्डेमार रस्ते, शहरातील कायदा-सुव्यवस्था, कर्जमाफी या सर्वांवर वर्पें चा रोख होता.
“कोपरगाव तालुक्यातल्या तालुक्यात १५ किलोमीटरवर जायला एक तास लागतो! मग नेमकं चाललंय तरी काय?” असा सवाल त्यांनी प्रशासनालाच नव्हे तर स्थानिक नेतृत्वालाही केला.
पत्रकार परिषदेमध्ये वर्पेंचा सूर फक्त तक्रारीचा नव्हता; त्यात आत्मविश्वास ही होता
“विधानसभेला आम्हाला ११ हजार मते मिळाली. समोरच्याचे आकडे मोठे दिसले, पण विशेष म्हणजे आजपर्यंत काळे कोल्हे यांच्या विरोधात तिसरी शक्ती म्हणून जे जे लढले त्या सर्वांची ती एकत्रित शक्ती व एकत्रित मते होती आज ती महायुती फुटण्याची अटळ शक्यता असून त्यांचे तीन उमेदवार यासह इतर अपक्ष यामुळे मतांचे मोठे विभाजन होणार असल्याने आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो, तर विजय अवघड नाही,” असा दावा त्यांनी ठोकून दिला.
कार्यकर्त्यांबाबत बोलताना त्यांनी मन मोकळं केलं
“आम्ही साधी माणसं आहोत. आमचं मोबाईलचं ऑफिस आहे, आमचेच आम्ही पीए आहोत. कधी संपर्कात थोडा उशीर झाला, तर गैरसमज करून घेऊ नका. आमचं लक्ष्य एकच; शरद पवारांचा विचार, उद्धव ठाकरेंची निष्ठा आणि काँग्रेसचा प्रामाणिकपणा.”
वर्पेंचे हे भाषणसत्र म्हणजे फक्त राजकीय निवेदन नव्हे, तर स्पष्ट इशारा होता.
“दोन्ही मित्रपक्षांनी स्वबळाचं सांगितलं आहे, त्यामुळे तिसरा पर्याय द्यायचं आमचं कर्तव्य आहे. तरीही शेवटच्या क्षणापर्यंत माझा प्रयत्न महाविकास आघाडी टिकवण्याचाच असेल,” असं म्हणत त्यांनी येत्या ५ नोव्हेंबरला अधिकृत घोषणा करण्याचा इशारा दिला.
तालुकाध्यक्ष बापू रांधवणे, कार्याध्यक्ष तानाजी जाधव,ॲड.दिलीप लासुरे, उपाध्यक्ष सुरेश आसणे, ॲड. रमेश गव्हाणे,युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनील वर्पे, युवक तालुकाध्यक्ष निखिल थोरात, युवक शहराध्यक्ष स्वप्नील पवार, कार्याध्यक्ष रिंकु मगर,उपाध्यक्ष माजिद पठाण, सामाजिक न्याय शहराध्यक्ष गौतम बनसोडे, उपाध्यक्ष शुभम शिंदे,उपाध्यक्ष दिनेश पवार,सोशल मीडिया शहराध्यक्ष ऋतुराज काळे, ओवेस शेख,गोवर्धन चुनावळे आदी उपस्थित होते. शेवटी आभार ॲड. दिलीप लासुरे यांनी मानले.
चौकट
कोपरगावच्या राजकारणात संदीप वर्पे यांनी पुन्हा एकदा स्वतःचा सूर ठामपणे ऐकवला आहे. पवारांचा वारसा, उद्धव ठाकरेंचा आत्मसन्मान आणि काँग्रेसचा आत्मविश्वास यांचा संगम जर एकत्र आला, तर सत्ताधाऱ्यांचा “स्वबळाचा” आवाज पुढच्या निवडणुकीत फारसा ऐकूही येणार नाही एवढं मात्र नक्की.- जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे,
Post Views:
66