कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणेंकडून शेतकरी कर्जमाफीला दुजोरा

कृषी मंत्री ना. दत्तात्रय भरणेंकडून शेतकरी कर्जमाफीला दुजोरा

Agriculture Minister N. Dattatreya Bharane confirms farmer loan waiver

कृषी मंत्र्यांच्या हस्ते कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे शानदार उदघाटन

निधी मिळविण्यासाठी माझा आदर्श ना.भरणे मामा – आ.आशुतोष काळे.

पुढील वर्षी जिल्ह्याचा कृषी महोत्सव कोपरगावला -कृषी मंत्री ना.दतात्रय भरणे

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sat8Nov 10.00Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव :- कधी दुष्काळ पडतो तर कधी गारपीट होते आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढलं की, बाजारभाव पडतात. त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी काय असतात याची मला जाणीव आहे कारण मी पण शेतकऱ्याचाच मुलगा आहे. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत नाही तर सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही मतदान करण्यासाठी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रमाणे निर्णय घेण्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे सकारात्मक आहेत. त्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शासनाला सादर होईल. सहकारी बँकांचे आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजेच जून २०२६ च्या आत कर्जमाफीचा घेतला जाईल अशी महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री या नात्याने ग्वाही देत असल्याचे सांगत कृषी मंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी शेतकरी कर्जमाफीला दुजोरा दिला आहे.

   मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या १३ व्या पुण्यस्मरणा निमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे उदघाटन’ राज्याचे कृषीमंत्री ना.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आ.अशोकराव काळे होते.

यावेळी पुढे बोलतांना कृषीमंत्री ना. दत्तात्रय भरणे म्हणाले की, आपण सर्वजण शेतकरी असून  शेतकरी आपली जात आहे त्यामुळे शेती करताना आपण आजही जुन्या पद्धतीने शेती करतो परंतु त्यामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन कसं घेता येईल त्यासाठी शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. शेतकऱ्यांसाठी राज्याचा कृषिमंत्री म्हणून राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला राज्याचे कृषिमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. मला  एवढं मोठ पद दिलं ते मिरवण्यासाठी नाही दिलेलं. माझ्या कृषी विभागाच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्याला अधिकचा न्याय कसा देता येईल हा माझा प्रयत्न आजही आहे आणि भविष्यामध्ये राहणार आहे. शेतकरी उभ्या केलेल्या पिकांबाबत अनेक स्वप्न रंगवतो परंतु कधी अतिवृष्टी होवून शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चक्काचूर होतोय हे मी पहिले आहे अनुभवले आहे. त्यामुळे  शेतकऱ्याचं दुःख आणि अडचणी याची मला कल्पना आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांसाठी कुठले निर्णय घेणे गरजेचे आहे, कुठले निर्णय घेतल्यानंतर शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त लाभ कसा होईल यासाठी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्यातून शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेतले जाणार आहेत.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ड्रीपसाठी प्र.मे.टन शंभर रुपये जादा भाव देत असल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांचे कौतुक करतांना मा.आ.अशोकराव काळे यांना उद्देशून तुमचा चेअरमन लय हुशार आहे तुम्ही त्याला खूप हुशार केले असल्याचे सांगत तुम्ही शासनाच्या अगोदर शेतकऱ्यांना मदत करतात खरोखर कौतुकास्पद असल्याचे आहे.कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचा आदर्श इतर कारखान्यांनी घ्यावा असे आवाहन करून केंद्र व राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेचा जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, ज्याप्रमाणे बारामती, मोशी, नासिक अशा दूरवरच्या ठिकाणी कृषी प्रदर्शन होत असतात परंतु त्या ठिकाणी आपल्या भागातील शेतकरी जावू शकत नाही त्यामुळे कृषी प्रदर्शन भरवावे अशी असंख्य शेतकऱ्यांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. ए आय या नवीन तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये सुरु झाला असून त्याला कृषी क्षेत्रही अपवाद नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होवून ऊस उत्पादन वाढीसाठी,दुग्ध व्यवसायासाठी अशा तंत्रज्ञानाचा उपयोग होऊन शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी हा या कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चा मुख्य उद्देश आहे.

ना.दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने एक प्रगतशील शेतकरी असलेले व शेतकऱ्यांच्या अडचणी  व प्रश्नांची सखोल जाणीव असलेले कृषिमंत्री  राज्याला लाभलेले आहे.  कृषी खात्याच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर व ए आय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती व्यवसायाचा खर्च कमी कसा करता येईल यावर जास्तीत जास्त भर देण्याचे काम कृषी खात्याच्या माध्यमातून सुरु आहे. शेती व्यवसाय हा  परवडणारा व्यवसाय कसा होईल आणि शेती हा व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्र कसा वाढेल व कसा घडेल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे.

मला मतदार संघातील जनतेने २०१९ ला निवडून दिले मतदार संघाच्या विकासासाठी मला तीन हजार कोटीपेक्षा जास्त निधी मिळविता आला यामागे कृषी मंत्री ना.दत्तात्रय मामा भरणे यांची प्रेरणा आहे. सरकार कोणतेही असो निधी  मिळविण्यात ते आघाडीवर असतात संपूर्ण राज्यात सर्वात जास्त सव्वा सहा हजार कोटी निधी मिळविण्याची किमया त्यांनी करून दाखविली आहे. मी पण त्यांचा आदर्श घेवून निधी मिळविण्यासाठी ते कशा प्रकारे पाठपुरावा करतात त्याप्रमाणे पाठपुरावा केल्यामुळे मलाही तीन हजार कोटीचा निधी मिळविता आला हे खुल्यामनाने आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगून टाकले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक कानडे, द्राक्ष बागायतदारराज्यसंघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले, कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन, उपाध्यक्ष नारायणराव मांजरे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे, सर्व संचालक मंडळ, संलग्न संस्थांचे चेअरमन व्हा.‌ चेअरमन, संचालक,  अधिकारी,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषद-पंचायत समितीचे माजी सदस्य, माजी नगरसेवक,  सभासद, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन यांनी केले. आभार उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी मानले तर सूत्रसंचालन गोरक्षनाथ चव्हाण यांनी केले.

पुढील वर्षीचे जिल्ह्याचे कृषी प्रदर्शन कोपरगावला  

चौकट :- आशुतोषने शेतकऱ्यांच्या वेदना, व्यथा जाणून घेवून शेतकऱ्यांना शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ होवून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ चे अतिशय सुंदर नियोजन केले आहे. त्याने मला जरी सांगितले नसले तरी, शेतकऱ्यांना अधिकचा फायदा व्हावा यासाठी यापेक्षा मोठे नियोजन करण्याची जबाबदारी मला आशुतोषवर द्यायची असून पुढील वर्षी होणारे अहिल्यानगर जिल्ह्याचे कृषी प्रदर्शन कोपरगावला होईल-कृषी मंत्री ना.दत्तात्रय भरणे.

ज्या झाडाला फळे त्याच झाडाला लोक दगड मारतात—

चौकट:- आ.आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की, काही लोक निवडणुका आल्या की, आदळ आपट सुरु करतात या वाक्याचा धागा पकडत कृषी मंत्री ना.दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, आशुतोष तू कामाचा माणूस आहे, तुझे काम सुरुच ठेव. ज्या झाडाला फळे नाही त्याला कोणीच दगड मारतं नाही. तू काम करणारं झाड आहे ज्याला फळ आहेत त्यामुळे त्याचा विचार करू नको हा निसर्ग नियमच आहे ज्या झाडाला फळ असतात त्याच झाडाला लोक दगड मारतात असे सांगत त्या लोकांचा विचार न करण्याचा सल्ला दिला.

दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ —

            चौकट:- कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या माध्यमातून नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्तीत दर देण्याबरोबरच सर्वोतोपरी सहकार्य करून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.बहुतांश शेतकरी  जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळाले आहे. ज्याप्रमाणे आजवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. त्याचप्रमाणे माझ्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असून तालुक्यातील दुध व्यवसायीकांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे आहे. त्याबाबत माझे प्रयत्न सुरु असून थोड्याच दिवसात आपणास आनंदाची बातमी देईल-आ. आशुतोष काळे.

          

Leave a Reply

You cannot copy content of this page