सोशल मीडिया रणांगण : निवडणुकीचं व्हर्च्युअल कुरुक्षेत्र!

सोशल मीडिया रणांगण : निवडणुकीचं व्हर्च्युअल कुरुक्षेत्र!

Social Media Battlefield: The Virtual Kurukshetra of Elections!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Thu 20Nov 10.25Am.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: शहरात नगरपरिषद निवडणुकीचं वारे वाहायला सुरुवात झाली की गावागावाचं तापमान आपोआप वाढतं. यंदा तर हवामान थंड असलं तरी राजकारणाचं तापमान कडाक्याला आलं आहे. उमेदवार रात्री उशिरापर्यंत घरोघरी फिरतायत, भेटीगाठी, कोपरसभा, चौकातल्या बैठका—सगळं सुरुच आहे. पण या पारंपरिक प्रचाराला मागे टाकत एक वेगळंच रणांगण पेटलंय सोशल मीडिया वॉर!

आज प्रचाराचा मोठा हिस्सा व्हॉट्सॲप ग्रुप, इन्स्टाग्राम रील्स, फेसबुक पोस्ट आणि यूट्यूब शॉर्ट्समध्ये सरकला आहे. पण या डिजिटल युद्धाची दिशा प्रबोधनापेक्षा दुर्भावनांचा बाजार जास्त बनू लागली आहे.

टीका नव्हे… गलिच्छ थुंकीफेक!

सोशल मीडियावर उमेदवार कोण काय विकास करणार, मतदारसंघातील प्रश्न कसे सोडवणार, यावर चर्चा व्हावी—ही अपेक्षा. पण प्रत्यक्षात काय होतंय? काही ग्रुपमध्ये, काही रील्समध्ये,काही पोस्टमध्ये कमेरेखाली वार करण्याची स्पर्धा लागली आहे. ओरडण्यापेक्षा आरडाओरडा, टीकेपेक्षा चिखलफेक, मतांपेक्षा मतभेदांची टोचणी… अशी वातावरण निर्मिती चालू आहे.

अजून गंमत म्हणजे हे सगळं करणारे व्यक्ती कोण? बहुतांशवेळा “आपल्याला काहीतरी बोलल्याचं समाधान” मिळवण्यासाठी कीबोर्डवर बोटं चालवणारे आयरे-गायरे लोक या ऑनलाइन गर्दीचा दर्जा असा की कधी कधी कोणत्या घरातलं मूल निबंध लिहील आणि कोणता मोठा नेता पोस्ट टाकेल—यात फरकच उरलेला नाही!

प्रतिमा… काचेसारखी नाजूक!

सोशल मीडियात वारंवार फिरणाऱ्या पोस्ट्स लोकांच्या मनावर छाप पाडतात.खोटी बातमी असो वा वाईट अफवा—ती पसरते मात्र वेगात‌परिणाम? अनेक वर्षांची प्रतिमा एका रीलमुळे डागाळते,नेत्यांचा सन्मान चिरडला जातो,मतदारांची धारणा दिशाभूल होते.आज एका पोस्टवर थट्टा होते; उद्या त्याच पद्धतीने कोणाच्याही खासगी आयुष्यावर बोट ठेवण्याचा रिवाज बनतो. समाज म्हणून आपण किती खोलवर घसरतोय याचं भान राहात नाही.

आचारसंहितेच्या चौकटीत राहणारे पत्रकार, पण चौकटी मोडणारे व्हॉट्सॲप योद्धे!

प्रसारमाध्यमांवर संपादकीय चौकट, आचारसंहिता, शब्दांची मर्यादा, जबाबदारी‌ सगळं असतं.पण सोशल मीडियावर?
ना चौकट, ना जबाबदारी, ना मर्यादा   ज्याला जे वाटेल ते लिहायचं आणि ‘फॉरवर्ड’ बटण दाबायचं.याचा परिणाम समाजाच्या राजकीय चर्चेचा स्तर दिवसेंदिवस खाली जातोय .

प्रचार करा! पण दर्जेदार करा!

सोशल मीडिया हा प्रचाराचा उत्तम मार्ग आहेयाबाबत वाद नाही.पण हे व्यासपीठ
खोटारडेपणा, गलिच्छ टीका, वैयक्तिक हल्ले करण्याचं साधन बनलं तर लोकशाहीचं नुकसान निश्चित.उमेदवारांनीही आपल्या कार्यकर्त्यांना संयम शिकवून“धारदार टीका करा, पण मर्यादेत रहा”हे सांगणं अत्यावश्यक आहे.मतदार आज हुशार आहे. त्याला पाहिजे. विकासाची दिशा, कामांची मुदत, प्रश्नांची उत्तरं, प्रामाणिक दृष्टीकोन त्याला करमणूक म्हणून गलिच्छ राजकारण नको.

सोशल मीडिया तुमचं शस्त्र, पण ते धारदार असू द्या… विषारी नव्हे!

निवडणुका येतात-जातात.नेते येतात-जातात.पण समाजात बोलीभाषेचं, चर्चेचं, विचारांचं काय होतं.ते कायम राहतं.सोशल मीडियावर एखाद्याच्या प्रतिष्ठेला तडा देऊन, एखाद्याचं नाव खराब करून,एखाद्यावर वैयक्तिक टीका करून,कोणाचंही भलं होत नाही.सोशल मीडियातून प्रचार करा, पण त्यात उत्कृष्टता ठेवा.मतदारांना विकासाची भाषा द्या.कारण शेवटी वारंवार कमरेखालचे वार करणारी राजकारणाची पातळी नाही, तर विकास दाखवणारी कामगिरीच चिरकाल टिकते.”

Leave a Reply

You cannot copy content of this page