कोपरगाव निवडणूक कोर्टात अडकली; निकाल राखून ठेवल्याने उमेदवारांचे भवितव्य ‘टांगणीला’

कोपरगाव निवडणूक कोर्टात अडकली; निकाल राखून ठेवल्याने उमेदवारांचे भवितव्य ‘टांगणीला’

Kopargaon election stuck in court; Candidates’ fate ‘in doubt’ as results reserved

सकाळपासून कोर्टाबाहेर गजबज; वाद–प्रतिवादांची झड – आता उद्याच्या निर्णयाकडे सर्वांची नजर

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Sun 2‌3Nov 20.30Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत आज अक्षरशः नवा ट्विस्ट निर्माण झाला. उमेदवारांचे भाग्य ठरवणारी प्रक्रिया थेट न्यायालयीन दारात अडकली असून कोर्टाने निकाल राखून ठेवल्यानंतर सर्वांच्या उरात धडकी भरली आहे.

कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत छाननीनंतर वैध ठरलेल्या काही उमेदवारांच्या नामनिर्देशनांवर आता कायदेशीर संकट उभं राहिलं आहे.शपथपत्रातील अपूर्ण माहिती आणि संशयास्पद दुरुस्ती यावरून काही उमेदवारांविरुद्ध स्थानिक न्यायालयात याचिका दाखल झाल्याने संपूर्ण निवडणूकच कोर्टाच्या दारात अडकली आहे.

याचिकाकर्त्यांनी असा गंभीर आरोप केला आहे की,निवडणूक अर्जासोबत जोडलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी, मालमत्ता-देणेदारी, बँक तपशील, उत्पन्न यांसारखी अनिवार्य माहिती काही उमेदवारांनी स्पष्ट न देता रिकाम्या जागा सोडल्या, तर काहींनी शपथपत्र एकदा सादर झाल्यानंतर बेकायदेशीररीत्या दुरुस्ती केल्याचा दावा करण्यात आला आहे. नियमांनुसार शपथपत्रात एकदा दिलेली माहिती बदलणे शक्य नसताना अशा बदलांवरुनच मोठा वाद निर्माण झाला आहे.

सकाळी साडेअकरापासूनच कोर्ट परिसरात प्रचंड गजबज, गर्दी आणि कुजबुज सुरू झाली. कोर्ट ११ वाजता सुरू झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी सायंकाळी तब्बल ५.३० वाजेपर्यंत खुर्चीत खिळून राहिले. दोन्ही बाजूंनी जोरदार वाद–प्रतिवादांची सरबत्ती होत राहिली; मुद्दे, कागदपत्रे, दावे-प्रतिदावे यांचा अक्षरशः महासंग्राम रंगला.

हा सर्व युक्तीवाद शांतपणे ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला—आणि इथूनच उमेदवारांच्या कपाळावर आठ्या वाढू लागल्या.निकाल राखून ठेवल्यामुळे अनेकांचे राजकीय भवितव्य टांगणीला लागले असून काहींनी तर देव पाण्यात ठेवला आहे.

निवडणुकीत आधीच प्रचारासाठी कमी अवधी; त्यात हे न्यायालयीन घोंगडं आल्याने उमेदवारांचे अक्षरशः तोंडच पाणी पळाले.पहिल्यांदाच अशी वेळ येत असल्याने संपूर्ण शहरात चर्चांना उधाण आलं आहे.

उद्याच्या कोर्टाच्या निकालाकडे आता सर्वांचे डोळे खिळले आहेत.निकाल कोणाच्या हाती भविष्य ठेवणार आणि कोणाचा पत्ता गंडणार?
याची प्रचंड उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page