कोयटे यांच्या वक्तव्यावर संताप; जाहीर माफीची मागणी

कोयटे यांच्या वक्तव्यावर संताप; जाहीर माफीची मागणी

Outrage over Koyte’s statement; Public apology demanded

कर्तव्यनिष्ठ नेत्यांचा अपमान मान्य नाही – गंगवाल व रणशूर यांची टीका

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन Mon 8Dec 19.30Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: शहरातील  राजकीय वातावरण पुन्हा तापले असून संदीप कोयटे यांनी दिवंगत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे व दिवंगत शंकरराव काळे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा जोरदार निषेध होत आहे. “या दोन्ही कर्तव्यनिष्ठ नेत्यांवर गुन्हे आहेत असा आरोप करण्याचा अधिकार कोयटे यांना नाही,” असा इशारा देत संतोष गंगवाल यांनी कोयटे यांनी तात्काळ जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली.

गंगवाल म्हणाले, पंचवीस वर्षे राजकीय क्षेत्रातून गायब झाल्यानंतर पुन्हा मैदानात येऊन असे बेछूट आरोप करणे चुकीचे आहे. स्वतः आणि आपल्या कुटुंबावर गंभीर गुन्हे दाखल असताना स्वच्छतेचा आव आणू नये.” त्यांनी कॅनरा बँक फसवणूक प्रकरणासह कोयटे पिता-पुत्रांवरील कारवायांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

दरम्यान जितेंद्र रणशूर यांनीही कोयटे यांच्यावर कडवी टीका केली. नावात समता असली तरी वागण्यात विषमता दिसते. आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या पुढाकारातून उभारलेल्या वाचनालयाला ‘समता स्टडी सेंटर’ नाव देताना खरोखरच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रेम असते तर त्यांच्या नावाने वाचनालय उभारले गेले असते,” असे ते म्हणाले.

रणशूर पुढे म्हणाले की, गेल्या २४ वर्षांत काका कोयटे कधीच आंबेडकर स्मारकाजवळ महापरिनिर्वाण दिन, जयंती किंवा धम्मचक्र परिवर्तन दिनी दिसले नाहीत. दिखाव्यापुरते प्रेम आणि निवडणुका आल्या कीच सक्रियता, हा त्यांचा नेहमीचा पॅटर्न आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याबाबत विरोधक जाणीवपूर्वक गैरसमज पसरवत असल्याचा आरोपही रणशूर यांनी केला. फक्त कोपरगावच नव्हे, तर राज्यातील २४ नगरपालिका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पण कोयटे गट निवडणूक कोल्हे गटामुळे पुढे गेली असे खोटे सांगत आहे. हे जनतेची दिशाभूल करणारे राजकारण आहे,” असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ काळ्या फिती लावून आंदोलन करणे म्हणजे न्यायालयाचा अपमान असल्याचाही आरोप त्यांनी विरोधकांवर केला.

शेवटी रणशूर म्हणाले, अर्धवट माहिती देऊन नागरिकांमध्ये गोंधळ पसरवणारे राजकारण आम्ही सहन करणार नाही. सत्य लपविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा आम्ही जोरदार निषेध करतो.”

 

Leave a Reply

You cannot copy content of this page