कोपरगावला अखेर कायमस्वरूपी वनाधिकारी मिळाला!

कोपरगावला अखेर कायमस्वरूपी वनाधिकारी मिळाला!

Kopargaon finally gets a permanent forest officer!

आ. आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश — बिबट्यांच्या हल्ल्यांपासून नागरिकांना दिलासा

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu 11Dec 16.00Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : मतदार संघात गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यांनी नागरिकांमध्ये तीव्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. दोन निरपराध नागरिकांचा बळी गेल्यानंतर परिस्थिती अधिकच गंभीर बनली. या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे स्वतंत्र व पूर्णवेळ वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) नेमण्याची मागणी केली होती. अखेर महायुती शासनाने ही मागणी मान्य करत कोपरगावला कायमस्वरूपी  वन अधिकारी नियुक्त केल्याची माहिती आ. काळे यांनी दिली.

बिबट्याच्या हल्ल्यात महिला आणि मुलगी ठार झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन छेडले होते. त्याचवेळी घटनास्थळावरूनच आ. काळेंनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी संपर्क साधून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली होती. त्यानंतर नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचा आदेश मिळून तो निकालात काढण्यात आला. मात्र परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असल्याने भीतीचं सावट कायम होतं. नागरिकांच्या सुरक्षेचा विषय लक्षात घेऊन रिक्त असलेल्या पूर्णवेळ वनाधिकारी पदासाठी नियुक्ती व्हावी, अशी लेखी मागणी आ. काळे यांनी शासनाकडे केली होती.

काळेंच्या पाठपुराव्यानंतर अखेर कोपरगावला कायमस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी मिळाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. “बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे तातडीने सक्षम वनअधिकारी आवश्यक होते. नव्या वनाधिकाऱ्यामुळे  गस्तीसह सर्वेक्षण, ट्रॅकिंग, जनजागृती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला गती मिळेल. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक प्रभावी पद्धतीने काम होईल,” असा विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

या निर्णयाबद्दल आ. काळेंनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांचे आभार मानले असून, नवीन वन अधकारी नियुक्तीमुळे वन्यजीव व्यवस्थापन अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page