नगरपरीषदेची सत्ता द्या, उरलेले प्रश्न तीन वर्षांत निकाली काढू – आ. आशुतोष काळे
Give us control of the municipal council, and we will resolve the remaining issues within three years – MLA Ashutosh Kale
कोपरगावमध्ये विकासाची गंगा वाहणारच
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat 13Dec 19.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव नगरपरीषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या. शहराच्या विकासाचे एकही मूलभूत प्रश्न शिल्लक ठेवणार नाही, असा ठाम विश्वास आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक ६ व ७ मध्ये आयोजित प्रचार कॉर्नर सभेत ते बोलत होते.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश (काका) कोयटे तसेच प्रभाग ६ व ७ मधील नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा झाली. यावेळी आ. काळे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत कोपरगावच्या सर्वांगीण विकासाचा सविस्तर आराखडा मांडला. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून अनेक मुख्य रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. स्वच्छता, भूमिगत गटारी, शहर सुशोभीकरण यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडित उरलेल्या प्रश्नांवर येत्या तीन वर्षांत कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, असा त्यांनी शब्द दिला.
आ. काळे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली. त्यापैकी तब्बल चाळीस वर्षे विरोधकांकडे सत्ता होती. त्या काळात कोपरगावचा विकास वेगाने व्हायला हवा होता, मात्र जाणीवपूर्वक विकासाची गंगा अडवण्यात आली. नागरिकांचे प्रश्न सुटले तर राजकारण कशावर करणार, या मानसिकतेतून प्रश्न प्रलंबित ठेवले गेले. विकास हे कधीच त्यांचे उद्दिष्ट नव्हते, त्यामुळेच कोपरगाव मागे पडले. ज्या प्रमाणे पवित्र गोदावरी कोपरगावमधून वाहते, त्याचप्रमाणे आता विकासाची गंगा वाहू लागेल, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
दरम्यान, प्रभाग ४ मधील प्रचार फेरीत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. अनेक माता-भगिनींनी काका कोयटे यांचे औक्षण करत ‘इडापिडा जाऊ दे, बळीचे राज्य येऊ दे’ अशी भावना व्यक्त केली. त्यावर काका कोयटे म्हणाले, “मी निवडून येणारच, आणि कोपरगावमध्ये इडापिडा जाऊन विकासाचेच राज्य येणार आहे.” कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवून शहर पुन्हा विकासाच्या वाटेवर आणणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगावला विकसित शहरांच्या यादीत नेण्याचा आपला निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट :
प्रभाग ६ व ७ मधील कॉर्नर सभेला लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित महिलांनी आ. आशुतोष काळेंच्या रूपाने सक्षम आणि महिलांची काळजी घेणारा लोकप्रतिनिधी मिळाल्याची भावना व्यक्त केली. “आम्ही आमच्या लेकाला २०२४ मध्ये निवडून दिले, आता आमच्या काकाला निवडून देणार,” असा विश्वास यावेळी महिलांनी व्यक्त केला.
Post Views:
29





