नगरपालिकेची सत्ता द्या, चार वर्षांत कोपरगावचा चेहरामोहरा बदलू – आ. आशुतोष काळे
Give us control of the municipality, and we will transform the face of Kopargaon in four years – MLA Ashutosh Kale
“घोषणा नव्हे, प्रत्यक्ष विकास दाखवतो”
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat 13Dec 10.00Am.By सालकर राजेंद्र
कोपरगाव:आता केवळ आश्वासनांचे राजकारण नको, तर प्रत्यक्ष कामातून दिसणारा विकास कोपरगावकरांना हवा आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करून कोपरगावचा चेहरामोहरा बदलवून दाखवतो, असा ठाम विश्वास आ. आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
आगामी कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ व १३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते बोलत होते.
कोपरगाव शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, भूमिगत गटारी, भूमिगत वीजवाहिन्या, आरोग्य, शिक्षण आणि मूलभूत नागरी सुविधा या विकासाच्या केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनेक वर्षे कोपरगावकरांनी फक्त घोषणा ऐकल्या आहेत. आता प्रत्यक्ष कामातून बदल दाखवण्याची वेळ आली आहे. विकास आराखडा तयार करून टप्प्याटप्प्याने सर्व कामे मार्गी लावली जातील, असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला असून पुढील काळातही विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडली आहे. आता नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्या, शहराचा विकास ही केवळ जबाबदारी नाही तर सामाजिक बांधिलकी आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश (काका) कोयटे यांनी थेट आकड्यांतून विकास मांडला. प्रभाग १२ मध्ये १ कोटी ८० लाख, तर प्रभाग १३ मध्ये ४ कोटी १३ लाख रुपयांची कामे पूर्ण अथवा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. २३ दिवसाआड मिळणारे पाणी आता चार दिवसाआड येत आहे. रस्ते, गटारी आणि नागरी सुविधांमुळे शहराचा चेहराच बदलतो आहे, असे ते म्हणाले.
“आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी द्या. कोपरगाव स्वच्छ, विकसित आणि समृद्ध करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू,” असा निर्धार कोयटे यांनी व्यक्त केला. विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार असून, त्याला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचे सभेत स्पष्ट दिसून आले.
Post Views:
48





