निवडणुक की दहशत; पराभवाच्या भीतीतून विरोधकांचा हिंसाचार; संदीप कोयटे
Election or terror? Violence by the opposition out of fear of defeat; Sandeep Koyte
समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर भररस्त्यात जीवघेणी मारहाण
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSat 13Dec 15.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव नगरपरिषदेची निवडणूक आता केवळ मतपेटीपुरती राहिलेली नसून, ती थेट रस्त्यावरच्या दहशतीपर्यंत येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर होताच विरोधकांची घालमेल सुरू झाली असून, पराभव डोळ्यांसमोर दिसू लागताच त्यांनी हिंसाचाराचा मार्ग स्वीकारल्याचा गंभीर आरोप समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी केला आहे. समता पतसंस्थेच्या एका कर्मचाऱ्यावर भररस्त्यात करण्यात आलेली जीवघेणी मारहाण हा निवडणुकीतील वाढत्या दहशतीचा कळस असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील रहिवासी असलेले समता पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब दत्तात्रय ठोंबरे हे सोमवारी (दि. १५) सकाळी वारीहून कोपरगावकडे येत असताना शहरातील बेट नाक्याजवळ चार ते पाच जणांनी त्यांची दुचाकी अडवली. “तू काकासाहेब कोयटे यांचे सोशल मीडिया पेज चालवतोस का?” अशी चौकशी करत, नकारात्मक उत्तर मिळूनही “आमच्याकडे पुरावे आहेत,” असे म्हणत त्यांच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. कपडे फाटेपर्यंत झालेल्या या हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत ठोंबरे यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच संदीप कोयटे यांनी रुग्णालयात जाऊन ठोंबरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी नाव न घेता विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. “कोपरगावकरांना शांत, निर्भय निवडणूक हवी आहे. पण विरोधक व्यापाऱ्यांना धमकावत आहेत, समता पतसंस्थेबाबत सोशल मीडियावर अपप्रचार करत आहेत आणि आता थेट कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत मजल मारली आहे. हा सगळा प्रकार पराभवाच्या भीतीतून सुरू असलेला हतबलपणा आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
समता पतसंस्थेविरोधात सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी गुरुवारी (दि. ११) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. “चार दिवस झाले तरी आरोपी सापडत नसेल, तर पोलीस प्रशासन कोणाच्या दबावाखाली आहे, हे कोपरगावकरांना वेगळं सांगायची गरज नाही,” असे म्हणत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“आम्ही व्यापारी आहोत, दहशतीला दहशतीने उत्तर देणार नाही. मात्र २० तारखेला मतपेटीतून जनता यांना चोख प्रत्युत्तर देईल,” असा स्पष्ट इशाराही संदीप कोयटे यांनी दिला. या मारहाणीप्रकरणी तरी तातडीने गुन्हा दाखल होणार का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
Post Views:
55