नगराध्यक्ष निष्ठावान शिवसैनिकच हवा – अंबादास दानवे
The mayor must be a loyal Shiv Sena member – Ambadas Danve
‘चॉकलेट वाटणारे उमेदवार, विकास मात्र शून्य’ असा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue 16Dec 21.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : “उपमुख्यमंत्री म्हणतो माझा नगराध्यक्ष करा, मुख्यमंत्री म्हणतो माझा करा; पण निधी कोण देतो हेच कळेनासं झालंय. बाहेर भांडणं आणि आत मात्र एकच गाठ,” असा घणाघाती टोला शिवसेनेचे नेते आमदार अंबादास दानवे यांनी लगावला. मंगळवारी (१६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात महाविकास आघाडीच्या उमेदवार सपना मोरे यांच्या प्रचारसभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला.
“सत्ताधाऱ्यांचे उमेदवार अमिषांची चॉकलेट वाटतील; पण विकासाच्या बाबतीत दोघांचाही हिशेब शून्य आहे,” असा आरोप करत दानवेंनी मशाल चिन्हाला मतदान करण्याचं आवाहन केलं. आमचा उमेदवार सामान्य घरातून आलेला, निष्ठावान शिवसैनिक असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोपरगावला १३१ कोटींचा निधी मिळाला; मात्र त्याचा हिशेब देण्याची तयारी सत्ताधाऱ्यांत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. चार दिवसाआड पाणीपुरवठा, स्वच्छतेची दयनीय अवस्था, धुळीचे रस्ते, खड्डे, उद्यानांचा अभाव, महिलांसाठी स्वच्छतागृहांची टंचाई—“शहर हळूहळू खेड्याकडे नेलं जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. गोदावरीत गटाराचं पाणी सोडून मोठ्या घोषणा केल्या जात असल्या, तरी रिसायकलिंग व भूमिगत गटारयोजना कागदावरच असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
“३५० कोटी प्रामाणिक हातात गेले तरी कोपरगावचं चित्र बदलू शकतं,” असं सांगत अतिक्रमण हटवूनही पुनर्वसन नसल्याने रोजगार बुडत असल्याचं दानवेंनी निदर्शनास आणलं. क्रीडा संकुल व कृषी प्रदर्शनाच्या ५४ एकर जागेवरील कब्जा सत्ता आल्यास न्यायालयातून मुक्त करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
राज्यावर प्रचंड कर्ज असून भ्रष्टाचार आणि जात–धर्म तेढ पसरवली जात असल्याचा आरोप करत, “आम्ही हिंदुत्ववादी आहोत; मुस्लिमविरोधी नाही,” असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं. “झाशीच्या राणीच्या हातात तलवार होती; आज कोपरगावच्या लेकीच्या हातात मशाल आहे—ही मशाल परिवर्तनाचा प्रकाश देईल,” असं म्हणत त्यांनी सभेची सांगता केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल सोनवणे होते. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सपना मोरे,शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कोते, राष्ट्रवादी (शरद पवार गट) जिल्हाप्रमुख संदीप वर्पे, विधानसभा संघटक असलम शेख भरत मोरे, प्रमोद लबडे, बाळासाहेब जाधव संजय दंडवते, श्रीरंग चांदगुडे, मुकुंद सिनगर, प्रवीण शिंदे,बालाजी गोरडे, मुन्ना मन्सुरी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज कोपते यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी आभार गगन हाडा यांनी व्यक्त केले.
Post Views:
33