मास्टर स्ट्रोक : बावनकुळेंच्या घोषणांनी कोपरगावातील राजकीय चित्र बदलले

मास्टर स्ट्रोक : बावनकुळेंच्या घोषणांनी कोपरगावातील राजकीय चित्र बदलले

Masterstroke: Bawankule’s announcements have changed the political landscape in Kopargaon.

घरांचे उतारे, तुकडेबंदीचा प्रश्न, मोफत नकाशे आणि सौरऊर्जेच्या भूमिकेने प्रचारसभेला निर्णयाचा रंग

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu 18Dec 16.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या घोषणांनी कोपरगावातील राजकीय वातावरणात मोठी हालचाल निर्माण झाली आहे. घरांचे उतारे, रजिस्ट्र्या, तुकडेबंदी, बांधकाम नकाशे, वीजदर आणि सौरऊर्जा यांसारख्या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर त्यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका सभेचे लक्ष वेधून घेणारी ठरली.

भाजपा–मित्रपक्षांच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना बावनकुळे यांनी कोपरगाव शहरातील विविध भागांतील सुमारे ५,५०० ते ६,००० घरांना उतारे देण्याचा निर्णय जाहीर केला. हनुमाननगर, दत्तनगर, महादेव नगर, गोराबा नगर, गांधी नगर, सुभाषनगर, लक्ष्मीनगर, साईनगर, येवला रोड, टाकळी नाका आदी भागांतील घरमालकांना याचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तुकडेबंदी कायद्यामुळे वर्षानुवर्षे अडकलेल्या घरांच्या रजिस्ट्र्यांबाबत बोलताना त्यांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील, तसेच संपूर्ण कोपरगाव शहर ‘वर्ग एक’ करण्यात येईल, अशी माहिती दिली.

घरबांधकाम प्रक्रियेत दिलासा देत त्यांनी एनए व सनदीची आवश्यकता नसणार, तसेच प्रत्येक घराचा नकाशा मोफत करून देण्यात येईल, असे स्पष्ट केले. यासाठी लागणारा खर्च शासन उचलेल व नागरिकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.

ऊर्जेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना कोपरगावात राबवण्याचा मानस व्यक्त केला. २०२९ पर्यंत २.८० रुपये दराने वीज उपलब्ध करण्याचा शासनाचा उद्देश असून, पंतप्रधान सूर्यघर योजनेतून कोपरगावसाठी पाच हजार घरे मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या की, गेल्या २५ वर्षांपासून महिला बचतगट, गारमेंट क्लस्टर आणि रोजगार निर्मितीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले आहे. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन शहराच्या विकासासाठी काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

यावेळीबोलताना युवानेते विवेक कोल्हे यांनी मागील सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळावर टीका केली. मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होऊनही नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पाणीपुरवठा व स्वच्छतेच्या समस्यांमुळे आरोग्याच्या प्रश्नांना नागरिकांना सामोरे जावे लागले, असे सांगत आगामी काळात घरपट्टी, पाणीपट्टी आणि शालेय शुल्कात सवलत देण्यासारख्या उपाययोजना राबवण्याचा विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.

नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराग संधान यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेल्या विश्वासनाम्याची माहिती दिली. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्ते, उद्याने, गोदावरी संवर्धन, वॉकिंग ट्रॅक, घरकुल योजना, अतिक्रमण नियमितीकरण तसेच डिजिटल सेवा व हेल्पलाईन यांचा त्यात समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसांत १०० कामे पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

सभेला यावेळी मंचावर बिपीनदादा कोल्हे, माजी आ.स्नेहलता कोल्हे,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,युवानेते विवेक कोल्हे आदींसह सर्व उमेदवार,पदाधिकारी,मान्यवर आणि समोर उच्चांकी जनसमुदाय सभेला हजर होता

Leave a Reply

You cannot copy content of this page