कोयटेंच्या ‘एकाधिकारशाही’चा फुगा फुटला; व्यापारी महासंघाने सोडली साथ
Koyte’s ‘dictatorship’ bubble has burst; the Traders’ Federation has withdrawn its support.
रातोरात उमेदवारीचा निर्णय ठरला महाग; व्यापारी वर्गाचा ठाम नकार
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu 18Dec 19.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात व्यापारी महासंघाने अध्यक्ष काका कोयटे यांची साथ सोडताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. कोणालाही विश्वासात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारल्यामुळे व्यापारी महासंघात अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर ही अस्वस्थता आज अधिकृत पत्रकाद्वारे उघडपणे समोर आली असून, अनेक वर्षांची संघटनात्मक मेहनत एका निर्णयामुळे धोक्यात आल्याची भावना व्यापारी वर्गात व्यक्त होत आहे.
व्यापारी महासंघाने स्पष्ट शब्दांत भूमिका घेत सांगितले की, महासंघ हा कोणत्याही व्यक्तीचा किंवा पक्षाचा राजकीय अड्डा नाही. व्यापाऱ्यांचे प्रश्न, बाजारपेठेचा विकास, व्यवसायवृद्धी आणि व्यापारी हित जपणे हाच महासंघाचा मूळ उद्देश असून, कोणत्याही वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी संघटनेचा वापर खपवून घेतला जाणार नाही.
आजवर महासंघाने विविध राजकीय प्रवाहांशी संवाद ठेवत तटस्थ भूमिका जपली होती. मात्र अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे महासंघाची तटस्थता धोक्यात आली असून, संघटनेत फूट पडल्याचा आरोपही या पत्रकात करण्यात आला आहे. “महासंघाच्या नावावर वैयक्तिक राजकारण करणे व्यापाऱ्यांना मान्य नाही,” असा ठाम सूर महासंघाने लावला आहे.
“महासंघ कोणाचाही राजकीय अड्डा नाही” – पदाधिकाऱ्यांची ठाम भूमिका
महासंघाचे उपाध्यक्ष नारायण शेठ अग्रवाल, उपाध्यक्ष केशवराव भवर, बबलूशेठ वाणी, संतोष गंगवाल, सत्येन मुंदडा, महावीर दगडे आदी पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे जाहीर भूमिका घेतली.पत्रकात नमूद करण्यात आले आहे की,“आजवर ज्या शक्तीच्या बळाचा बागुलबुवा दाखवला जात होता, तोच आधार निवडणुकीच्या तोंडावर दूर गेल्याचे चित्र आहे.” या बोचऱ्या टीकेमुळे कोयटेंच्या राजकीय गणितांचा फज्जा उडाल्याचा संदेश व्यापारी महासंघाने अप्रत्यक्षपणे दिला आहे. निवडणुकीच्या ऐन वेळी महासंघाची साथ सुटणे हा कोयटे यांच्यासाठी मोठा राजकीय झटका मानला जात आहे.
चौकट
कोयटेंभोवतीचा ‘राजकीय ससेमिरा’ : अडचणींची मालिका
काका कोयटे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून अडचणींची मालिका सुरू आहे. उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतरही विरोधकांनी प्रतिज्ञापत्रकावर आक्षेप घेत थेट न्यायालयात धाव घेतली होती. ही लढाई कोयटे पार करून आले, मात्र निवडणूक तब्बल १८ दिवस लांबल्याने संपूर्ण यंत्रणा पुन्हा कामाला लावावी लागली.
दुसऱ्या टप्प्यात सोशल मीडियावर समता पतसंस्थेच्या कर्जदारांच्या बातम्यांनी वातावरण तापले. त्यानंतर सहाय्यक निबंधकांकडून चौकशीचा ससेमिरा लागला. या सर्व वादांना तोंड देत कोयटे यांनी परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक अंतिम टप्प्यात असतानाच व्यापारी महासंघाने थेट साथ सोडल्याने पुन्हा एकदा ते अडचणीत सापडले आहेत.
राजकीय जाणकारांच्या मते, विरोधकांनी कोयटे यांना सतत गुंतवून ठेवण्यात यश मिळवले आहे. ‘राजयोग’ सांगणाऱ्या ज्योतिषांनी मात्र हा योग किती कठीण परीक्षेतून जाईल, याचा अंदाज दिला नव्हता का?, अशी कुजबुज आता शहरात रंगू लागली आहे.
Post Views:
106