घोषणांची आतषबाजी, कामाचा शून्य हिशेब – राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

घोषणांची आतषबाजी, कामाचा शून्य हिशेब – राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल

A barrage of announcements, but zero accountability for the work done – the NCP’s attack on the government.

भूमिगत वीज ‘हवेतच’; उताऱ्यांचे गाजर निवडणुकीपुरतेच!

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu 18Dec 19.20Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : “घोषणा मोठी, काम शून्य” हेच  खरे मॉडेल असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. उर्जामंत्री असताना कोपरगाव शहरातील सर्व वीजवाहिन्या भूमिगत करण्याची घोषणा करणाऱ्या विद्यमान महसूलमंत्र्यांनी वर्षानुवर्षे एकही काम केले नाही. आजही शहरात वीजवाहिन्या हवेत लोंबकळत असून पोल वाकलेलेच आहेत. अशा परिस्थितीत आता जागांचे उतारे देण्याची नवी घोषणा करून कोपरगावकरांची पुन्हा एकदा फसवणूक केली जात असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी येऊन दरवेळी नवीन गाजर दाखवण्याची सवय या मंत्र्यांना लागली आहे. तुकडेबंदी कायदा शिथिल करणे, वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये करणे, शासकीय जमिनीवरील रहिवाशांना उतारे देणे—या सगळ्या घोषणा यापूर्वीही झाल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात कोपरगावच्या जनतेच्या पदरी काहीच पडले नाही. मग ज्यांनी भूमिगत वीजसारखे मूलभूत काम केले नाही, ते उताऱ्यांचे स्वप्न कसे पूर्ण करणार? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.

“लाव रे तो व्हिडीओ” या सोशल मीडियातील म्हणीप्रमाणे, उर्जामंत्री असतानाचा भूमिगत वीजवाहिन्यांचा व्हिडीओ पुन्हा समोर आला आहे. त्या व्हिडीओमुळे भाजपच्या घोषणांची पोलखोल झाली असून, घोषणा करूनही काम शून्य ही बाब जनतेसमोर उघडी पडली आहे. त्यामुळे आता नव्या आश्वासनांवर विश्वास ठेवायचा तरी कसा, असा प्रश्न नागरिक विचारत असल्याचे राष्ट्रवादीने नमूद केले.

भाजपचे उमेदवार निवडून आले तरच सगळे देऊ, असा दबाव टाकणारा सूरही लोकशाहीला धरून नाही. विकास हा हक्क आहे, तो मतांच्या बदल्यात वाटण्याचा माल नाही, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्याचाही तीव्र निषेध केला आहे.

थोडक्यात, भूमिगत वीजप्रमाणेच उताऱ्यांचाही प्रश्न हवेतच विरणार का, हा कोपरगावकरांचा खरा सवाल आहे. घोषणांची आतषबाजी झाली, पण जमिनीवर काम कधी उतरणार, याचे उत्तर भाजपकडे नाही,आणि म्हणूनच या निवडणुकीत जनता भाजपच्या घोषणाबाजीला योग्य धडा शिकवेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसने व्यक्त केला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page