प्रचाराचा भडीमार थांबवण्यासाठी हास्याची मेजवानी
A feast of laughter to stop the barrage of propaganda.
कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचा ‘महाराष्ट्राचा हास्यविनोद संगीत कार्यक्रम’; हजारोंची गर्दी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu 18Dec 19.30Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :नगरपरिषदेची निवडणूक लांबल्याने कोपरगावकरांना पुन्हा प्रचाराचा मारा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना थोडा दिलासा मिळावा, तसेच प्रचारही वेगळ्या पद्धतीने व्हावा, या उद्देशाने आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे बुधवारी (दि. १७) तहसील कार्यालयाच्या मैदानावर ‘महाराष्ट्राचा हास्यविनोद संगीत कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना आ. आशुतोष काळे म्हणाले, “२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोपरगावच्या जनतेने मला ऐतिहासिक मताधिक्याने निवडून दिले. हा कौल माझ्या विकासकामांवर आणि प्रामाणिक भूमिकेवर टाकलेला विश्वास आहे. हा विश्वास कायम राखत कोपरगावच्या विकासासाठी पुढेही पूर्ण ताकदीने काम करणार आहे.”
कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तो निधी राज्य शासनाकडून आणण्याची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी सांगितले. “आजपर्यंत कोट्यवधींचा निधी शहरासाठी आणला आहे. पुढील काळातही पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मोठा निधी मिळवून देणार आहे. मात्र निधी वेळेत आणि योग्य पद्धतीने खर्च होण्यासाठी नगरपालिकेत विकासदृष्टी असलेले नेतृत्व हवे. म्हणूनच नगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे असणे गरजेचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.
विरोधकांवर टीका करताना काळे म्हणाले, “विकासकामांना विरोध करणे, न्यायालयीन स्थगिती आणणे, राजकीय द्वेषातून अडथळे निर्माण करणे हीच त्यांची भूमिका राहिली आहे. याचा फटका कोपरगावच्या विकासाला बसला आहे. त्यामुळे यावेळी नगरपालिकेची एकहाती सत्ता राष्ट्रवादीला द्या.”
नगराध्यक्षपदासाठी काकासाहेब कोयटे यांची उमेदवारी दिल्याचा उल्लेख करताना त्यांनी स्पष्ट केले की, “घरातील व्यक्ती नव्हे तर समाजाशी एकरूप असलेला माणूस आम्ही पुढे आणला आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवणे, रखडलेली कामे मार्गी लावणे आणि शहराचा विकास करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.”
यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे म्हणाले, “कोपरगाव कला-संस्कृतीची पंढरी आहे. आ. आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ सुरूच राहील. पहिल्या १०० दिवसांचा, एक वर्षाचा आणि पुढील पाच वर्षांचा ठोस विकास आराखडा आमच्याकडे तयार आहे.” महिलांना रोजगार, प्रत्येक प्रभागात उद्यान, क्रीडांगण, आरोग्य व शिक्षण सुविधा यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात विनोदी कलाकार भाऊ कदम, कुशल बद्रिके, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत यांनी हास्याची आतषबाजी केली, तर गायक रोहित राऊत आणि गायिका राधिका भिडे यांनी गाण्यांनी रंगत वाढवली. अभिनेता सागर कारंडे यांनी पत्रवाचनाच्या अनोख्या शैलीतून भावनिक क्षण निर्माण केले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कोपरगावकर उपस्थित होते.
Post Views:
30






