कोपरगावमध्ये सुषमा अंधारेंनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली
In Kopargaon, Sushma Andhare launched a scathing attack on the ruling party.
सभा, पैसा, महिला सुरक्षा आणि काळ्या राजकारणावर घणाघात
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनFir19 Dec 21.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सपना मोरे व महाविकास आघाडीच्या नगरसेवकांच्या प्रचारार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात झालेल्या जाहीर सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या व प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ही सभा म्हणजे दिखाऊ राजकारणाचा पर्दाफाश असल्याचे सांगत त्यांनी सभा यशस्वी करण्यासाठी पैसा ओतण्याची संस्कृती लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप केला.
“दहा–वीस हजार माणसं जमवण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो, ही लोकशाहीचीशोकांतिका आहे. आज त्यांची, उद्या माझी – सत्ता बदलत राहते; पण कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे,” असे ठणकावून सांगत त्यांनी मतदारांच्या शहाणपणावर विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोपरगावला येऊन मतदारांना सांगतात त्यांना वाटते कोपरगाव ची लोक धोतरावर शर्टिंग करतात की डोक्याला गोड तेल लावतात असा गैरसमज करू नये, असेही त्या म्हणाल्या.
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर अंधारे यांनी सरकारला कठोर सवाल केले. “तीन वर्षांच्या मुलीपासून सत्तर वर्षांच्या महिलांपर्यंत कुणीच सुरक्षित नाही. ‘लाडकी बहीण’ योजना असली तरी महिलांच्या सुरक्षेवर मौन आहे. गृह मंत्रालय अपयशी ठरले असून पोलीस दात नसलेल्या वाघासारखे झाले आहेत,” अशी टीका त्यांनी केली. मात्र पोलीस यंत्रणेबाबत राग नसून दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांविषयी सहानुभूती असल्याचेही त्या म्हणाल्या.
ड्रग्स, अवैध धंदे, काळा पैसा आणि तपास यंत्रणांच्या गैरवापराचे आरोप करत त्यांनी मतदारांना स्पष्ट संदेश दिला – “पैसे घ्या, पण मत विवेकाने द्या.” नगरपरिषद हीच मोठ्या बदलाची नांदी असल्याचे सांगत झोपडपट्टी पुनर्वसन, गोदावरी घाट विकास, छोटे उद्योग व बचत गटांना चालना देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
“वर्षानुवर्षांचे काळे कोल्हे थांबवा. गोरे नसतील तरी मोरे निवडा. हा बदल तुमच्या आणि तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी आहे,” असे आवाहन करत अंधारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटालाच स्वच्छ, सुसंस्कृत व सुरक्षित पर्याय असल्याचा ठाम दावा केला.
यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सपना मोरे जिल्हाप्रमुख सचिन कोते राष्ट्रवादी जिल्हाप्रमुख संदीप वर्पे, भरत मोरे, बाळासाहेब जाधव, प्रमोद लबडे, गगन हाडा आदिसह सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार पदाधिकारी हजर होते सूत्रसंचालन व आभार मनोज कपोते यांनी मानले.
Post Views:
21





