कोपरगावचा विकास  इंदौरच्या धर्तीवर राबवा; नावलौकिक वाढवा – बिपीन कोल्हे 

कोपरगावचा विकास  इंदौरच्या धर्तीवर राबवा; नावलौकिक वाढवा – बिपीन कोल्हे 

Develop Kopargaon on the lines of Indore; enhance its reputation – Bipin Kolhe

मकरसंक्रांतीनिमित्त लोकनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संजीवनीत सत्कार

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed14 Jan 18.40Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :कोपरगाव शहरवासियांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष व बहुमताने निवडून दिलेल्या नगरसेवकांवर जो विश्वास टाकला आहे, त्याला कुठेही तडा जाऊ न देता इंदौर, विशाखापट्टणम सारख्या प्रगत शहरांच्या धर्तीवर कोपरगावचा सर्वांगीण विकास साधावा व जिल्ह्यात नगरपालिकेचा कारभार नावलौकिकास्पद करावा, असे स्पष्ट प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

मकरसंक्रांतीच्या पर्वावर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी संजीवनी उद्योग समूहाच्यावतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर तसेच स्वीकृत नगरसेवक अतुल काले व सौ. सोनल अमोल अजमेरे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बिपीन कोल्हे बोलत होते. प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

बिपीन कोल्हे पुढे म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी सातत्याने योगदान दिले. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून दूरदृष्टीने धोरणे राबवली. आता शहरवासियांनी भाजपा–रिपाई मित्रपक्ष लोकसेवा आघाडीच्या हाती पालिकेची सत्ता दिल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांची जबाबदारी अधिक वाढली आहे. मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छ व सुंदर शहर, दर्जेदार रस्ते, धूळमुक्त कोपरगाव यासह मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे. इंदौर, विशाखापट्टणम सारख्या शहरांतील यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून शासकीय व निमशासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष पराग संधान यांनी, युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीत दिलेला विश्वासनामा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने काम करू, अशी ग्वाही दिली. उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी, कोल्हे कुटुंबियांनी उपनगराध्यक्षपदी संधी देऊन आंबेडकरी चळवळीचा सन्मान केला असल्याची भावना व्यक्त केली. स्वीकृत नगरसेवक अतुल काले व सोनल अजमेरे यांनी, आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवून शहराच्या विकासात सक्रिय योगदान देऊ, असे सांगितले.

यावेळी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार संचालक बाळासाहेब वक्ते यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page