खेळ म्हणजे जीवनशाळा; ‘मी’पेक्षा ‘आपण’ घडवणारा संस्कार – नितीन कोल्हे
Sports are a school of life; a discipline that fosters ‘we’ over ‘me’ – Nitin Kolhe
संजीवनी सैनिकी स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवात दिल्ली राष्ट्र स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ब्रास बँडचा सन्मान,
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed14 Jan 13.10Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगांव : खेळ म्हणजे केवळ शारीरिक ताकद, विजय-पराजय किंवा स्पर्धा एवढाच मर्यादित विषय नसून तो मानवी मूल्ये, संघभावना, संयम आणि हार-जीत समतोलपणे स्वीकारण्याची ताकद देणारी जीवनशाळा आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनीकेले.
संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
खेळातून परस्पर प्रेम, आदर, सहकार्य, शिस्त आणि एकात्मतेची भावना निर्माण होते. बहुतांशी खेळ संघाने खेळले जात असल्याने प्रत्येक खेळाडूची भूमिका तितकीच महत्त्वाची ठरते. त्यामुळे ‘मी’पेक्षा ‘आपण’ ही भावना दृढ होत असून,यशाचे श्रेय सर्वांना आणिअपयशाची जबाबदारीही सर्वांनी स्वीकारण्याचीमानसिकता विकसित होते, असे नितीन कोल्हे यांनी नमूद केले.
सैनिकी शिक्षणात शारीरिक कसरती, कवायती, शिस्तबद्ध दिनक्रम आणि खेळ यांचा समन्वय साधला जातो.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंदुरुस्तीबरोबरच मानसिक कणखरपणा, नेतृत्वगुण, संघभावना आणि देशभक्ती विकसित होते. क्रीडा स्पर्धांतील नियोजन, शिस्त व नियमबद्ध खेळ हीच मूल्ये सैनिकी शिक्षणाचीही आधारस्तंभ असल्याचे श्री कोल्हे यांनी स्पष्ट केले.
यावेळी संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बँड संघाच्या उल्लेखनीय कामगिरीचा विशेष गौरव करण्यात आला. हा संघ सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्यस्तरावर विजेता ठरला असून, यंदा विभागीय स्पर्धेतही यश मिळवत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या स्पर्धेत संजीवनीचा संघ सात राज्यांच्या पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
महोत्सवात २९ कलाकारांच्या ब्रास बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या पथकाचे मार्गदर्शक संगीत शिक्षक श्री महेश गुरव यांचा गौरव करण्यात आला. ब्रास व ताल वर्गवारीतील २९ अद्ययावत वाद्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती, तालबद्धता व सांघिक सुसूत्रतेचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सांगितले.
प्रारंभी डायरेक्टर (नॉन ॲकॅडेमिक) डी. एन. सांगळे यांनी स्वागत केले. अध्यक्ष नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त शश सुमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी संस्था शैक्षणिक, क्रीडा व सैनिकी प्रशिक्षण क्षेत्रात सातत्याने अग्रेसर कामगिरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले. व्यासपीठावर प्राचार्य कैलास दरेकर व कॅम्पस ॲडमिन विजय भास्कर उपस्थित होते.
Post Views:
8





