संशोधनातूनच उद्योजक घडतील; तरुणांनो प्रयोगशील व्हा – डॉ. बी.व्ही.आर. मोहन रेड्डी

संशोधनातूनच उद्योजक घडतील; तरुणांनो प्रयोगशील व्हा – डॉ. बी.व्ही.आर. मोहन रेड्डी

Entrepreneurs will emerge through research; young people, be innovative – Dr. B.V.R. Mohan Reddy

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत २५० संशोधन निबंध; ‘अमुर्त’चे प्रकाशन

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनThu15 Jan 19.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव : शिक्षण आणि उद्योग यांची सांगड घालत संशोधनाच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयोग झाले, तरच तरुण उद्योजक घडतील, असे ठाम प्रतिपादन हैदराबादस्थित सायंट या बहुराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक अध्यक्ष व आयआयटी हैदराबाद अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.व्ही.आर. मोहन रेड्डी यांनी केले. संजीवनी युनिव्हर्सिटीने उद्योगांशी अधिक समन्वय साधून संशोधनाला बळकटी द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संजीवनी युनिव्हर्सिटीच्या वतीने आयोजित ‘सस्टेनेबल इनोव्हेशन इन इंजिनिअरिंग, सायन्स अँड मॅनेजमेंट’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. परिषदेचे अध्यक्षस्थान युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री. अमित कोल्हे यांनी भूषविले.

यावेळी संयुक्त संचालक (संशोधन संघटना) भारतीय विद्यापीठे, नवी दिल्लीचे डॉ. अमरेंद्र पाणी, जपानच्या टोकुशिमा युनिव्हर्सिटीचे प्रा. डॉ. पंकज कोईंकर, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचे डॉ. अजित जावकर, युनिव्हर्सिटी ऑफ चेस्टर (यूके)चे डीन डॉ. अलेक्स फेन्टन, संजीवनी युनिव्हर्सिटीचे व्हाइस चान्सलर डॉ. ए.जी. ठाकुर, डीन डॉ. कविथा राणी व संशोधन संचालक डॉ. पी. विलिअम उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘अमुर्त’ स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. रेड्डी यांनी हवामान आपत्ती, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन, तंत्रज्ञान, दीर्घायुष्य अशा विषयांवर संशोधनाची गरज अधोरेखित करताना, “तंत्रज्ञानच शाश्वत विकासाचा खरा आधार आहे. राष्ट्रउभारणीत सहभागी होत नोकऱ्या देणारे उद्योजक बना,” असा सल्ला दिला.

डॉ. अमरेंद्र पाणी म्हणाले, “संशोधन अधिक प्रभावी आणि समाजोपयोगी असले पाहिजे. शाश्वत विकासामुळे गरीबी आणि भूक दूर होऊ शकते. एआयच्या युगात संशोधनाचा समाजाला थेट लाभ कसा होईल, याचा विचार गरजेचा आहे.”

दोन दिवस चाललेल्या या परिषदेच्या समारोपप्रसंगी एसव्हीकेएम एनएमआयएस ग्लोबल युनिव्हर्सिटीचे सल्लागार डॉ. माधव नारायण वेल्लींग उपस्थित होते. त्यांनी संशोधनातील नैतिकतेचे महत्त्व विशद केले. यावेळी दहा नवसंशोधकांच्या उत्कृष्ट संशोधन निबंधांचा सत्कार करण्यात आला.

परिषदेत एकूण २५० संशोधन निबंध सादर झाले. देश-विदेशातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती. प्रा. डॉ. सुंधाशु भट यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. अमोल ढाकणे यांनी आभार मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page