कोपरगाव ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धनावर श्रेयवादाचा खेळ – संजय काळेंचा घणाघात
The upgrading of Kopargaon Rural Hospital has become a game of claiming credit – Sanjay Kale launches a scathing attack.
पुन्हा १०० खाटांची ढोलकी बडवून आधीचे सत्य दडपले!
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनSun18 Jan 19.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन होणार, अशी अलीकडील बातमी म्हणजे नवी घोषणा नसून पाच वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याचा थेट आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
अधिकृत कागदपत्रांचा दाखला देत काळे म्हणाले की, २०२१ मध्येच रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालय म्हणून १०० खाटांची मान्यता मिळाली होती.प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, ३०.७६ कोटींचा कार्यारंभ आदेश आणि कोट्यवधींची बिले अदा होऊनही आज “३० खाटांचे १०० होणार” अशी बातमी देणे म्हणजे जनतेच्या बुद्धीची थट्टा करणे आहे.
“हे वास्तव जनतेला माहीत आहे, मग शासन व पालक मंत्र्यांना कसे माहीत नाही?की माहीत असूनही सोयीस्कर मौन बाळगले जाते?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
खाटांची संख्या नव्हे तर रुग्णालय चालणार का? हा खरा प्रश्न असल्याचे सांगत काळे म्हणाले, “इमारत उभी राहील, फलक लागेल; पण डॉक्टर, तज्ज्ञ सेवा आणि सुविधा असतील का?”माहेगाव देशमुख येथील उद्घाटन झालेल्या पण अपूर्ण क्षमतेने चालणाऱ्या रुग्णालयाचे उदाहरण देत त्यांनी श्रेयवादावर टोला लगावला.“शासनात आंधळं दळतं आणि कुत्रं पिठ खातं अशी अवस्था आहे.
दुसऱ्याच्या कामावर स्वतःचं नाव लावून बारसं करण्याची स्पर्धा सुरू आहे,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.प्रसिद्धीच्या हव्यासापोटी वास्तव न तपासता बातम्या देऊ नका, असे आवाहन करत काळे म्हणाले,“लोक विसरभोळे नाहीत. नोटा न घेणारे, पण नोटांच्या राजकारणाला ओळखणारे अजून जिवंत आहेत.”
कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचा मुद्दा केवळ घोषणा आणि श्रेयवादापुरता मर्यादित न राहता, खऱ्या अर्थाने आरोग्यसेवा सक्षम करण्याची इच्छाशक्ती कुणाकडे आहे, हा खरा प्रश्न आहे, असे या निमित्ताने ठळक झाले आहे.
Post Views:
18





