कोपरगाव नगरपालिकेत महिलांच्या हाती सत्तेची सूत्रे;कोल्हे गटाचा निर्णय ठरतोय मैलाचा दगड
Women take the reins of power in Kopargaon Municipality; the decision of the Kolhe group proves to be a milestone.
चार विषय समित्यांचे नेतृत्व महिलांकडे; शहरविकासाला संवेदनशील आणि निर्णायक वळण
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनMon19 Jan 19.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण बदल घडवत विषय समित्यांची नवी रचना जाहीर करण्यात आली असून, या प्रक्रियेत महिलांच्या सशक्त नेतृत्वाला प्राधान्य देण्यात आले आहे. एकूण सहा विषय समित्यांपैकी चार समित्यांचे सभापतीपद महिलांकडे गेल्याने नगरपरिषदेत ‘महिला राज’ प्रस्थापित झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे शहराच्या विकास प्रक्रियेला मानवी संवेदनशीलता, प्रशासनिक पारदर्शकता आणि कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगरपरिषदेच्या सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी निलोफर फिरोज पठाण यांची निवड करण्यात आली आहे. शहरातील रस्ते, नागरी सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या कामांवर आता महिलांचे नेतृत्व राहणार आहे. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी वैशाली विजय वाजे यांची नियुक्ती झाली असून, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर अधिक काटेकोर नियोजन अपेक्षित आहे.
शिक्षण, क्रीडा व संस्कृती समितीवर संजना संजय उदावंत, तर महिला व बालकल्याण समितीवर सविता कैलास मंजूळ यांची निवड करण्यात आली आहे. याच समितीवर उपसभापतीपदी मनीषा दत्तू पगारे यांची निवड झाल्याने महिलांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळाले आहे.
दरम्यान, नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष जितेंद्र चंद्रकांत रणशूर, तर स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी वैभव सुधाकर आढाव यांची निवड करण्यात आली आहे. शहराच्या प्रशासनाचा कणा मानली जाणारी स्थायी समितीवर विद्या राजेंद्र सोनवणे आणि प्रसाद बाळासाहेब आढाव यांची सर्वानुमते, एकमताने निवड करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष पराग संघान हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असतात.
या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, मा. आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी व नागरिकांनी अभिनंदन केले. महिलांच्या हाती महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी देणे हा केवळ पदवाटपाचा निर्णय नसून, तो राजकीय दूरदृष्टी आणि सामाजिक जाणीवेचा ठोस संदेश असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
महिला नेतृत्वामुळे शहराच्या विकासकामांत आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, महिला व बालकल्याण या विषयांना अधिक प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. कोपरगाव नगरपरिषदेतील हा निर्णय नागरिकाभिमुख, समतोल आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने टाकलेले निर्णायक पाऊल ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Post Views:
23





