संस्कारांची परंपरा, शिक्षणाची जबाबदारी; सुशीलामाईंचा वारसा पुढे नेण्याचा आ.काळेंचा निर्धार
The tradition of values, the responsibility of education; MLA Kale’s resolve to carry forward Sushilamai’s legacy.
२५ व्या रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनMon19 Jan 20.00Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :“सौ. सुशीलामाई काळे यांच्या प्रेमळ संस्कारांनी आम्हाला माणुसकी, कर्तव्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाचे मोल शिकवले. त्या केवळ आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ नव्हत्या, तर संपूर्ण काळे परिवाराच्या मूल्यांची दिशा ठरवणाऱ्या व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वारसा जपत शिक्षणसेवेचा वसा पुढे नेत आहोत,” असे भावनिक प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव–कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कला, विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ आयोजित २५ व्या रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरणप्रसंगी ते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभागाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती अश्विनी निकम उपस्थित होत्या.
आ. आशुतोष काळे पुढे म्हणाले की, “माझे आजोबा कर्मवीर शंकररावजी काळे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलांपर्यंत शिक्षण पोहोचावे या ध्यासातून रयत शिक्षण संस्थेसाठी आयुष्यभर अविरत परिश्रम घेतले. त्या ध्येयपूर्तीसाठी सुशीलामाई आजींनी त्यांना सदैव खंबीर साथ दिली. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी आग्रह धरून अनेक शाळा व महाविद्यालये सुरू करण्यास प्रवृत्त केले. त्यातून हजारो मुलींची आयुष्ये घडली.”
वक्तृत्व स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, “वक्तृत्व म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे, तर विचारांची ताकद आहे. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वैचारिक प्रगल्भता आणि समाजभान निर्माण होते. आजच्या पिढीने निर्भीड व मूल्याधिष्ठित विचार मांडावेत, ही समाजाची अपेक्षा आहे.”
प्रमुख अतिथी श्रीमती अश्विनी निकम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मराठी माध्यमांच्या शाळांचा गौरव केला. “एमपीएससी परीक्षेत यशस्वी होणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण व मराठी माध्यमातील असतात. महिलांना जीवनात दुहेरी जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात, त्यामुळे विद्यार्थिनींनी कणखर बनले पाहिजे,” असा सल्ला त्यांनी दिला. मोबाईलचा योग्य वापर, मैदानी खेळांचे महत्त्व, आत्मविश्वास आणि वेळेचे नियोजन यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरू कोळपे, संभाजीराव काळे, माजी उपसभापती वाल्मीकराव कोळपे, सरपंच सौ. सुमनताई कोळपे यांच्यासह शिक्षण व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती सुशीला थोरात यांनी स्वागत व आभार मानले. प्रास्ताविक के. बी. चांदगुडे यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीमती रोहिणी म्हस्के यांनी केले.
Post Views:
37





