“संकटांचा वारा असेल, तेव्हाच यशाची उंच भरारी”– रेणुका कोल्हे

“संकटांचा वारा असेल, तेव्हाच यशाची उंच भरारी”– रेणुका कोल्हे

“Only amidst the winds of challenges can one achieve the highest flight of success” – Renuka Kolhe

पतंग महोत्सवातून सुरक्षिततेचा संकल्प; रेणुका कोल्हेंच्या नेतृत्वात ‘मांजा नको’चा हुंकार

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue20 Jan 16.00Pm.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव :“वारा विरुद्ध असेल तरच पतंग उंच उडतो. त्याचप्रमाणे आयुष्यात संकटे आली तरी त्यावर मात केली, तर यशाची भरारी निश्चित आहे. मूल्ये, प्रामाणिकपणा आणि संयम हाच समाजाच्या प्रगतीचा मजबूत दोर आहे,” असे स्पष्ट आणि प्रेरणादायी प्रतिपादन संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनी कोपरगावातील भव्य पतंग महोत्सवात केले.

शेजारच्या येवला तालुक्यातील पतंग महोत्सवाची परंपरा यंदा कोपरगावने प्रथमच आत्मसात केली. कोपरगाव नगरपालिका व संजीवनी युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून केबीपी शाळेच्या मैदानावर आयोजित या भव्य-दिव्य पतंग महोत्सवाने कोपरगावकरांचे लक्ष वेधून घेतले.

रेणुका कोल्हे पुढे म्हणाल्या,“पतंग महोत्सव म्हणजे केवळ करमणूक नाही, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारा उत्सव आहे. मकर संक्रांतीच्या काळात मांजामुळे मानव व पशुपक्ष्यांचे जीव धोक्यात येतात. त्यामुळे साध्या दोऱ्याने पतंग उडवूनही तितकाच आनंद घेता येतो,” असे सांगत त्यांनी स्वतः आसारी हातात घेऊन पतंगाला ढील देत ‘मांजा नको’चा संदेश कृतीतून दिला.

रंगीबेरंगी पतंगांनी आकाश व्यापले असताना, या उत्सवामागील सामाजिक व राजकीय आशय अधिक ठळकपणे समोर आला. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी सुरक्षित पतंगबाजीचा संकल्प घेतला.

नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले,

“विवेकभैय्या कोल्हे यांनी नेहमीच सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांना बळ दिले आहे. गोदावरी काठी आरती असो किंवा दहीहंडी—आता पतंग महोत्सवाच्या माध्यमातून कोपरगावच्या विकासाचा पतंग उंचच उडत राहील, हे निश्चित आहे.”

या महोत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला. महिलांची ही सक्रिय उपस्थिती म्हणजे कोपरगावमधील सामाजिक बदलाचे सकारात्मक प्रतीक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली.

चौकट

पतंगांनी व्यापलेले आभाळ, फुगे, आतषबाजी, गाण्यांच्या तालावर पतंगबाजीचा आनंद घेणारे लहान-थोर—यामुळे केबीपी मैदानात उत्सवाचे चैतन्य ओसंडून वाहत होते. या यशस्वी आयोजनाबद्दल कोपरगावकरांनी रेणुका कोल्हे व विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाचे विशेष कौतुक केले

Leave a Reply

You cannot copy content of this page