सुशीलामाईंच्या स्मृतींना शिक्षण, सेवा आणि संस्कारांची उजळणी
A tribute to Sushilamai’s memory through a reaffirmation of education, service, and values.
काळे शिक्षण संकुलात पुण्यतिथीनिमित्त उपक्रमांची रेलचेल; विद्यार्थ्यांचा सन्मान, स्वच्छता व वृक्षारोपण
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनTue20 Jan 19.50Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :स्व. सौ. सुशीलामाई काळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्मृती जपणाऱ्या, प्रेरणादायी आणि सामाजिक भान जागवणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्यक्रम पार पडले.
गौतम पब्लिक स्कूलमध्ये स्व. सुशीलामाई काळे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या माईज गार्डनला भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यानिमित्त आंतरशालेय चित्रकला स्पर्धा तसेच प्राथमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्काउट, गाईड व एन.सी.सी.च्या विद्यार्थ्यांनी माईसाहेबांच्या स्मृतीप्रित्यर्थ माईज गार्डनची स्वच्छता करून वृक्षांना पाणी घालून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
तालुका, जिल्हा व राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा, कला, सांस्कृतिक व विज्ञान प्रदर्शनात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच रौप्य महोत्सवी वर्षातील वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंतांचा रईसा शेख यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
दरम्यान, सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. सौ. विजया गुरसळ होत्या. यावेळी संस्थेचे इन्स्पेक्टर प्रा. नारायणराव बारे यांनी सुशीलामाई काळे यांच्या कार्याचा गौरव करताना, “शिक्षण हीच प्रगतीची खरी ताकद आहे, या विचारातून माईसाहेबांनी विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. मुलगी शिकली तर दोन घरांना उजाळा देते, या भावनेने त्यांनी अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलले,” असे मनोगत व्यक्त केले.
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या वतीने शहाजापूर, कोळपेवाडी व कुंभारी येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. कोळपेवाडी बाजारतळ, कुंभारी येथील राघवेश्वर देवस्थान परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण करण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड व न्यू इंग्लिश स्कूल काकडी येथे प्रतिमा पूजन व बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शैक्षणिक, क्रीडा व विविध स्पर्धांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
या विविध कार्यक्रमांना राघवेश्वर मंदिराचे मठाधीपती महंत १०८ श्री. राघवेश्वरानंदगिरी महाराज, संस्थेचे इन्स्पेक्टर प्रा. नारायणराव बारे, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्व. सुशीलामाई काळे यांचे शिक्षण, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचे कार्य आजही पिढ्यांना प्रेरणा देत असल्याची भावना यावेळी सर्वत्र व्यक्त झाली.
Post Views:
18







