कोपरगावची लेक, कर्तृत्वाचा शिक्कामोर्तब; डॉ. कांचन लवांडे यांची एम.एस. परीक्षेत सुवर्ण भरारी
A daughter of Kopargaon, proving her mettle; Dr. Kanchan Lavande achieves a golden feat in the M.S. examination.
कान-नाक-घसा एम.एस.मध्ये ७२.३७ टक्के; कोल्हापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अव्वल
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईनWed21 Jan 16.50Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :जिद्द, सातत्य आणि गुणवत्तेच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, याचा वस्तुपाठ कोपरगाव शहरातील निवारा येथील डॉ. कांचन राजेंद्र लवांडे यांनी घालून दिला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या हिवाळी नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ सत्रात झालेल्या कान-नाक-घसा (ENT) एम.एस. वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षेत ७२.३७ टक्के गुणांसह विशेष प्राविण्य मिळवत त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूरमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
ही कामगिरी केवळ गुणांची नाही, तर कठीण परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या यशाची साक्ष आहे. दहावी-बारावीपासूनच विशेष गुणवत्तेची परंपरा जपणाऱ्या डॉ. कांचन यांनी संपूर्ण वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण केले. अभ्यासातील चिकाटी, शिस्तबद्ध परिश्रम आणि उद्दिष्टाप्रती निष्ठा यामुळेच हे यश शक्य झाले, असे त्यांच्या वाटचालीकडे पाहता प्रकर्षाने जाणवते.
या उल्लेखनीय यशाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. किसनराव लवांडे, संजीवनी कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
डॉ. कांचन लवांडे या कोपरगाव आगाराचे सेवानिवृत्त सहायक आगारप्रमुख भाउसाहेब पोटभरे यांची नात तसेच राधाबाई काळे महिला महाविद्यालय, अहिल्यानगर येथील प्रा. राजेंद्र लवांडे यांची कन्या आहेत. त्यांना वैद्यकीय शिक्षणकाळात अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
कोपरगावच्या मातीतील ही कन्या आज वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल यशाची ओळख निर्माण करत असून, तिची ही यशोगाथा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे—हे निश्चित.
Post Views:
28





