पाच समित्यांवर थेट महिलांची कमान; ही तर विश्वासनाम्याची अंमलबजावणी – रेणुका कोल्हे 

पाच समित्यांवर थेट महिलांची कमान; ही तर विश्वासनाम्याची अंमलबजावणी – रेणुका कोल्हे 

Women directly in charge of five committees; This is the implementation of the trust deed – Renuka Kolhe

 विकासासाठी महिलांना निर्णायक जबाबदाऱ्या; सकारात्मक बदलाची नांदी

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb12 Thu.17.30 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव : “नगरपालिकेतील पाच महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतीपदी महिलांची नियुक्ती ही केवळ औपचारिकता नसून नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान जाहीर केलेल्या ‘विश्वासनाम्या’ची प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे,” असा ठाम दावा संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका कोल्हे यांनी केला. महिलांना निर्णायक भूमिका देत कोपरगावच्या कारभारात सकारात्मक बदलाची नांदी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदाचा पदग्रहण समारंभ गुरुवारी (दि.१२) माधवराव कच्चेश्वर आढाव विद्यालय येथे उत्साहात पार पडला. सविता कैलास मंजुळ यांची सभापतीपदी, तर मनीषा दत्तू पगारे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संधान, उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास जगताप, नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कोपरगावकरांनी कोल्हे परिवार व भाजपा-आरपीआय मित्र पक्षावर टाकलेल्या विश्वासाला पात्र ठरत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व्हिजननुसार काम सुरू असल्याचे रेणुका कोल्हे यांनी नमूद केले. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता व महिला सुरक्षेसारख्या प्रलंबित प्रश्नांवर प्राधान्याने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांना मोठ्या प्रमाणात जबाबदाऱ्या देऊन शहरातील माता-भगिनींपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचा मानस असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. संजीवनी बचत गटाच्या माध्यमातून तालुक्यात सुमारे ३० हजार महिलांचे संघटन उभे राहिले असून ही चळवळ राज्यासाठी आदर्श ठरल्याचा उल्लेख त्यांनी केला.

महिलांच्या नेतृत्वातून कोपरगावच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

You cannot copy content of this page