पतसंस्था ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी राजसभेत धनंजय महाडिकांचा बुलंद आवाज; ग्रामीण अर्थकारणाला नवी दिशा
Dhananjay Mahadik’s loud voice in Rajya Sabha for the protection of credit institution depositors; New direction for rural economy
महाराष्ट्र राज्य फेडरेशनच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची संसदेत दखल;
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb12 Thu.17.50 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : सहकारी पतसंस्थांच्या ठेवीदारांच्या सुरक्षेचा प्रश्न अखेर संसदेत दणदणीतपणे मांडला गेला. कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत पतसंस्थांतील ठेवींना ठेव विमा संरक्षण देण्याची तसेच यूपीआय डिजिटल पेमेंट सुविधा लागू करण्याची ठाम मागणी करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले.
देशभरात सुमारे ९० हजारांहून अधिक सहकारी पतसंस्था कार्यरत असून त्यापैकी तब्बल २४ हजार ५०० संस्था महाराष्ट्रात आहेत. ग्रामीण व निमशहरी भागातील अर्थकारणाचा कणा असलेल्या या संस्थांकडे सुमारे २ लाख ७५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी आहेत. मात्र राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांप्रमाणे ५ लाख रुपयांपर्यंत ठेव विमा संरक्षण नसल्याने ठेवीदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
गेल्या काही वर्षांत काही पतसंस्थांना आलेल्या आर्थिक अडचणींमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची आयुष्यभराची बचत धोक्यात आली. या पार्श्वभूमीवर ठेवीदारांचा विश्वास टिकवण्यासाठी ठेव विमा संरक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले. तसेच, डिजिटल व्यवहारांच्या युगात पतसंस्थांना यूपीआयसारखी सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक अजूनही रोख व्यवहारांवर अवलंबून राहतात, ही वस्तुस्थितीही त्यांनी मांडली.
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे महाडिक यांची भेट घेत पाठपुरावा केला होता. अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा, काका कोयटे, उपाध्यक्ष डॉ. शांतीलाल शिंगी, महासचिव शशिकांत राजोबा यांच्यासह शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांचीही भेट घेतली.
फेडरेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना संसदेतून मिळालेली ही उभारी ठेवीदारांसाठी आशादायी मानली जात आहे. सहकारी पतसंस्था अधिक बळकट होऊन लाखो ठेवीदारांचे हित सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. कोल्हापूर येथे महाडिक यांचा सत्कार करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती फेडरेशनकडून देण्यात आली.
Post Views:
2





