कोपरगावातील पायाभूत सुविधांमुळे वाढली गुंतवणूक; आ.आशुतोष काळे
Investment increased due to infrastructure facilities in Kopargaon; A. Ashutosh Kale
एक्स्पो-२०२६ स्थानिकअर्थकारणाचा बुस्टर; विकासाला नवी दिशा
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb13 Fir.18.50 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव :कोपरगाव शहरात मागील काही वर्षांत झालेल्या पायाभूत सुविधांच्या भक्कम उभारणीमुळे गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली असून शहराच्या अर्थकारणाला नवी गती मिळाली आहे, असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी ‘एक्स्पो-२०२६’च्या उद्घाटनप्रसंगी केले.
महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथे लायन्स, लिनेस, लिओ क्लब ऑफ कोपरगाव व क्रेडाई कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कर्मवीर शंकरराव काळे उद्योगसमूहाच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित ‘एक्स्पो-२०२६’चे उद्घाटन आमदार काळे यांच्या हस्ते पार पडले.
आमदार काळे म्हणाले की, शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणे, प्रमुख रस्त्यांचे सुदृढीकरण, शहर सुशोभीकरण आणि विविध विकासकामांमुळे कोपरगावची ओळख वेगाने बदलत आहे. परिणामी, अहिल्यानगरनंतर सर्वाधिक जमीन खरेदी-विक्री नोंदणी कोपरगावमध्ये होत असल्याचे त्यांनी नमूद केले. समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, मुख्य रेल्वे स्थानक आणि तालुक्यातील विमानतळ यांसारख्या सुविधांमुळे कोपरगावची संपर्क व्यवस्था अधिक सक्षम झाली आहे.
जगप्रसिद्ध शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या स्थानिक व्यापार, बांधकाम व सेवा क्षेत्रासाठी संधी निर्माण करत आहे. एक्स्पोच्या माध्यमातून उद्योजक, व्यावसायिक आणि ग्राहक यांना एकत्र आणून आर्थिक देवाणघेवाणीला चालना मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या १३ वर्षांपासून एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगावकरांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न होत असल्याचे सांगत, शहर व तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे आमदार काळे यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.
Post Views:
6





