कोपरगाव : मृत्यूचा सापळा ठरलेला रस्ता, आणखी एका चिमुकल्याचा बळी;
Kopargaon: Road turns into death trap, another child victim;
झगडे फाटा ते वडगाव पान हा रस्ता राजकारण्यांच्या उदासीनतेवर संतप्त ग्रामस्थांचा हल्लाबोल
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb13 Fir.20.10 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : झगडे फाटा ते वडगाव पान हा रस्ता आता विकासाचा नव्हे तर मृत्यूचा मार्ग ठरत आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांकडे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे होत असलेले दुर्लक्ष अखेर एका निरपराध पाच वर्षीय बालकाच्या जीवावर बेतले. जवळके येथे अंश विनोद जयस्वाल या चिमुकल्याचा ट्रकखाली चेंदामेंदा होऊन मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. “आता रस्ता नव्हे, उत्तर द्या!” असा सवाल करत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
केवळ 23 जानेवारी रोजी अंजनापूर शिवारात गुरुत्व कैलास गाढे या विद्यार्थ्याचा कंटेनरखाली मृत्यू झाला होता. त्या घटनेची शाई वाळायच्या आतच पुन्हा एका बालकाचा बळी गेला. अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांसाठी हा मार्ग जीवघेणा बनला आहे. शिर्डीकडे जाणाऱ्या वाहतुकीचा ताण वाढत असताना दुरुस्तीला मात्र निधी मिळत नसल्याचे चित्र आहे.
शेजारील तालुक्यांतील रस्ते चकाकत असताना कोपरगाव तालुक्याच्या वाट्याला मात्र खड्डे आणि अपघातच का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. सर्व पक्ष सत्तेत असताना दोष कोणाला द्यायचा, अशीही भावना व्यक्त होत आहे. येथील नेते संस्थांसाठी निधी खेचण्यात व्यस्त असून जनतेच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा केला असून मृत बालकाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, रस्ता तात्काळ दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता तरी जागे व्हावे, अन्यथा जनतेचा रोष अनावर होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
Post Views:
5






