“श्रेयासाठी घाई, नियमांना बाय?” सुखशांती नगरच्या भूमिपूजनावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

“श्रेयासाठी घाई, नियमांना बाय?” सुखशांती नगरच्या भूमिपूजनावरून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

“Hurry for credit, goodbye to rules?” Strong criticism of the ruling party over the groundbreaking ceremony of Sukhshanti Nagar

२२ लाखांच्या कामाचे ‘अनधिकृत’ भूमिपूजन; तक्रारीनंतर फलक हटवला, 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb16 Mon.19.10 Pm.By  सालकर राजेंद्र 

कोपरगाव: शहरातील सुखशांती नगरमध्ये संरक्षक भिंतीच्या कामावरून सत्ताधाऱ्यांना चांगलाच धक्का बसला आहे. सुमारे २२ लाख रुपयांच्या निधीतून होणाऱ्या या कामाचे भूमिपूजन सत्ताधारी कोल्हे गटाने घाईघाईत उरकून घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमानंतर काही तासांतच पालिकेला संबंधित फलक हटवावा लागल्याने शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचा दावा आहे की, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेला हा निधी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे. मात्र, या कामाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी स्थानिक नगरसेवकांना डावलून आणि राजशिष्टाचार न पाळता रविवारी (दि.१५) सुट्टीच्या दिवशीच भूमिपूजन केल्याचा आरोप आहे.

नगरसेवक राहुल शिरसाठ यांनी थेट आरोप करत म्हटले की, “सत्तेचा गैरवापर करून आयत्या पिठावर रेघा ओढण्याचा प्रकार सुरू आहे. कुणाच्या हौसेसाठी अनधिकृत भूमिपूजन करणे थांबवावे.” त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार दिल्यानंतर प्रशासनाने भूमिपूजनाचा फलक हटवला. या कारवाईमुळे सत्ताधारी गटाची मोठी नामुष्की झाल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगरपरिषदेवर प्रशासक असताना या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली होती आणि त्यानुसारच निधी मंजूर झाला. गेल्या दोन महिन्यांत पालिकेला कोणताही नवीन निधी मिळालेला नसताना अचानक भूमिपूजनाचा कार्यक्रम कसा झाला, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,

“विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र नियम बाजूला ठेवून आणि संबंधितांना विश्वासात न घेता कार्यक्रम घेणे चुकीचे आहे. विकासाच्या कामात पारदर्शकता हवी.”

Leave a Reply

You cannot copy content of this page