२०२६ ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी वेगात!
Preparations for 2026 Gram Panchayat elections in full swing!
जानेवारी–डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर; ४ मेपर्यंत अंतिम आराखडा प्रसिद्ध होणार
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,Feb17 Tue.19.20 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : राज्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, ही माहिती पंचायत समिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने या संदर्भातील सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध करून प्रशासनाला ठोस वेळापत्रक दिले आहे
ग्रापंनि-२०२५/प्र.क्र.१३१/ई- १४०९६२३/पं.रा.-२ या आदेशानुसार १७ फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्रालयातून निर्देश जारी करण्यात आले. सन २०२२ च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. २२, २०२२ तसेच राज्य निवडणूक आयोग यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
असा असेल टप्प्याटप्प्याचा कार्यक्रम
२० फेब्रुवारीपर्यंत तहसीलदारांनी ‘गुगल अर्थ’ नकाशांवर आधारित गावनिहाय प्रारूप नकाशे अंतिम करायचे आहेत. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पाहणीतून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग व सीमा निश्चित केल्या जातील.
११ मार्चपर्यंत समितीमार्फत प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल. १७ मार्चला जिल्हाधिकारी ‘नमुना ब’ची तपासणी करून प्रस्ताव आयोगाकडे सादर करतील. २३ मार्चपर्यंत आयोगाकडून मान्यता अपेक्षित असून, ३० मार्चला समिती अंतिम स्वाक्षऱ्यांसह प्रारूप निश्चित करेल.
हरकती नोंदविण्याची संधी
७ एप्रिल रोजी प्रारूप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल. १३ एप्रिलपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना सादर करता येतील. २१ एप्रिलपर्यंत सुनावण्या पूर्ण करून २३ एप्रिलला अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाईल.
२८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना आयोगाकडे सादर केली जाईल आणि ४ मे २०२६ रोजी ‘नमुना अ’मध्ये अधिकृत प्रसिद्धी देण्यात येणार आहे.
सहसचिव वर्षा भरोसे यांच्या स्वाक्षरीने जारी परिपत्रकाची प्रत सर्व विभागीय आयुक्त, मुंबई शहर व उपनगर वगळता सर्व जिल्हाधिकारी तसेच आयोगाच्या उपसचिवांना पाठविण्यात आली आहे.
दरम्यान, पंचायत समिती कार्यालयाने कळविल्यानुसार, सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले असून २०२६ च्या ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी अधिकृतपणे सुरू झाली आहे.
Post Views:
6





