कोपरगावात ‘कोयता गँग’ची चाहूल; निवारा परिसरात रेकी, दोन मोटरसायकल चोरण्याचा प्रयत्न
‘Koyata Gang’ found in Kopargaon; Reiki in shelter area, two motorcycles stolen
सीसीटीव्हीत संशयितांची हालचाल कैद; नगरसेवक जनार्दन कदम व निर्मला आढाव यांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन, पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 7 Sat.18.30 Pm.By सालकर राजेंद्र
कोपरगाव : शहरात गेल्या काही दिवसांपासून संशयास्पद हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निवारा परिसरात अज्ञात तरुणांकडून रेकी करण्यात येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले असून, या पार्श्वभूमीवर दोन मोटरसायकली चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात ‘कोयता गँग’च्या वावराची चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही संशयित व्यक्ती परिसरात फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. त्यानंतर अल्पावधीतच दोन मोटरसायकली चोरी करण्याच प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत काही अज्ञात तरुण परिसरात फिरत असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर नगरसेवक जनार्दन कदम व नगरसेवक निर्मला आढाव यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. घराबाहेर अनावश्यक फिरणे टाळावे, घराबाहेरील लाईट सुरू ठेवाव्यात, अनोळखी व्यक्ती दिसल्यास तात्काळ खबरदारी घ्यावी तसेच संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, संभाव्य घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास मोठा अनर्थ टाळता येऊ शकतो, अशी नागरिकांची भावना आहे. त्यामुळे शहरातील विविध युवा संघटना व स्थानिक नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे, तसेच पोलिसांनीही या भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी पुढे येत आहे.
सध्या या घटनांमुळे निवारा परिसरासह शहरातील नागरिकांमध्ये सावधगिरीचे वातावरण असून, संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
Post Views:
7






