स्वतःवर विश्वास ठेवा;जग जिंकण्याची ताकद महिलांतच –मा. आ. स्नेहलता कोल्हे
Believe in yourself; Women have the power to conquer the world –F. A. Snehlata Kolhe
महिला दिनानिमित्त स्पष्ट संदेश; कौशल्य, शिक्षण आणि एकजुटीच्या बळावर महिलांनी स्वावलंबनाकडे वाटचाल करावी
Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन,March 8 Sun.18.30 Pm. By सालकर राजेंद्र
कोपरगाव :महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. आयुष्यात संकटे आणि अडचणी येतच असतात; मात्र त्यांना घाबरून न जाता आत्मविश्वासाने त्यांचा सामना करण्याची ताकद महिलांनी स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे. आत्मविश्वास, कौशल्य आणि एकजुटीच्या बळावर महिलांमध्ये जग जिंकण्याची ताकद आहे, असा ठाम संदेश आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिला.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिलाई मशीन व आरी वर्क प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन तसेच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण आ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास अनेक मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
महिलांना मार्गदर्शन करताना आ. कोल्हे म्हणाल्या, समाजात स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कुटुंबाचा सांभाळ करताना महिलांनी स्वतःसाठीही वेळ काढला पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शिक्षण आणि कौशल्य या दोन गोष्टी महिलांना स्वावलंबनाकडे घेऊन जाणाऱ्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. त्यामुळे महिलांनी शिकत राहून स्वतःला सक्षम बनवणे आवश्यक आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, बचतगट चळवळीमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनासोबत आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पूर्वी बँक व्यवहारांची माहिती नसलेल्या अनेक महिला आज आर्थिक निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. यामुळे महिलांना कुटुंबात आणि समाजात सन्मानाचे स्थान मिळत आहे.
विधवा महिलांविषयी बोलताना त्यांनी समाजाने संवेदनशीलता दाखवण्याचे आवाहन केले. विधवा होणे हा तिचा गुन्हा नसून तिच्यावर आलेले दुर्दैव आहे. अशा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी आधार देणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महिलांनी एकजुटीच्या बळावर पुढे येत आत्मविश्वासाने काम केले तर समाज परिवर्तनाची ताकद त्यांच्या हातातच आहे, असेही त्यांनी सांगितले.
चौकट: स्त्रीशक्तीची उंच झेप
स्त्रीशक्ती ही लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा आणि अन्नपूर्णा या रूपांत समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. आव्हानांना सामोरे जात महिलांनी इतिहास घडवला आहे. आज आदिवासी समाजातील भगिनी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती म्हणून भूषवत भारत देशाचे ‘घर’ सांभाळत आहेत, तर घराचं अर्थकारण निर्मला सीतारामन समर्थपणे सांभाळत आहेत. स्त्रीशक्तीच्या सामर्थ्याची ही प्रेरणादायी झेप-स्नेहलता कोल्हे माजी आमदार
Post Views:
2





